नवी दिल्ली : मुथुट समूहाने ८०० वर्षांपासून संस्कार, संस्कृती, भाषा व राष्ट्रभक्ती जोपासली आहे. त्यामुळेच हा समूह आकाशाला गवसणी घालू शकला. हीच मूल्ये लोकमतनेदेखील जोपासली आहेत. मुथुट समूह ६० कोटी ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे, असे गौरवोद्गार लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी काढले.विविध क्षेत्रात विस्तारलेल्या मुथुट समूहाचे समूह संचालक एम.जी. जॉर्ज मुथुट यांची दर्डा यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जॉर्ज यांचे चिरंजीव व मुथुट समूहाचे उप-व्यवस्थापकीय संचालक अलेक्झांडर यावेळी उपस्थित होते. मुथुट समूहाच्या परंपरेची माहिती जॉर्ज यांनी दर्डा यांना दिली. नैतिकता, व्यावसायिक मूल्य, विश्वसनीयता, ग्राहक संरक्षण, सचोटी व व्यावसायिक पत ही सहा नैतिक मूल्ये ८०० वर्षांपासून मुथुट समूहाकडून जोपासली जात आहेत.मुथुट समूहाच्या कॉर्पोरेट मुख्यालयातील ५०० कर्मचाऱ्यांशी दर्डा यांनी संवाद साधला. लोकमत समूहाच्या गेल्या १०० वर्षांच्या इतिहासाची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. लोकमत समूहाने रुजविलेल्या पत्रकारितेच्या मूल्यांविषयीदेखील दर्डा यांनी यावेळी सांगितले. दिल्लीत अलकनंदामध्ये मुथुट यांनी दिवंगत मुलाच्या नावाने उभारलेली पॉल जॉर्ज ग्लोबल स्कूल व सेंट जॉर्ज शाळेस विजय दर्डा यांनी भेट दिली. पॉल जॉर्ज शाळेच्या प्राचार्या गीता करुणाकरन यांनी मराठीत संवाद साधून विजय दर्डा यांना आश्चर्याचा धक्का दिला. मुथुट समूहाच्या वाटचालीवर प्रकाशित छोटेखानी पुस्तिका जॉर्ज यांनी दर्डा यांना भेट दिली. तर राज्यसभा सदस्य असताना सभागृहात मांडलेल्या विविध विषयांचा संग्रह असलेले ‘पब्लिक इश्यू बिफोर पार्लमेंट’ हे स्वलिखित पुस्तक व आर्यमन देवेंद्र दर्डा यांचा ‘स्नो फ्लेक्स’ हा कवितासंग्रह विजय दर्डा यांनी जॉर्ज यांना सस्नेह भेट दिला.
मुथुट समूहाने जोपासले संस्कृती, भाषेसह राष्ट्रभक्तीचे संस्कार : विजय दर्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 3:10 AM