लखनौ : शिवपाल यादव आणि अखिलेश यादव या चुलते-पुतण्यांत समेट होण्याची शक्यता धुसर झाल्याने समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह आपल्या भावाच्या साह्याने नवा पक्ष व नवी धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. लोकदलाच्या झेंड्याखालीच ही आघाडी स्थापन केली जाणार असल्याची माहिती लोकदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील सिंह यांनी दिली आहे.मुलायमसिंह यादव यांनी गुरुवारी डॉ. राम मनोहर लोहिया ट्रस्टच्या सचिवपदावरून राम गोपाल यादव या भावाला हटवून त्यांच्या जागी शिवपाल या समर्थक भावाची नियुक्ती केली. त्यामुळे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय अधिवेशन होण्याआधीच समाजवादी पार्टीत नव्याने तणाव निर्माण झाला आहे. राम गोपाल यादव हे अखिलेश यांचे निष्ठावंतआहेत. समाजवादी पार्टीचे राज्यस्तरीय अधिवेशन २३ सप्टेंबर रोजी लखनौत, तर राष्ट्रीय अधिवेशन ५ आॅक्टोबर रोजी आग्रा येथे होणार आहे.मुुलायम (नेताजी) आणि शिवपाल आमच्यासोबत धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्याच्या दिशेने काम करतील. सोमवारी आम्ही एकत्र पत्रकार परिषद घेणार आहोत. नेताजी भविष्यातील रणनीतीबाबत खुलासा करणार असल्याने सोमवारी सर्वकाही स्पष्ट होईल. शिवपाल यांच्याशी या मुद्यांवर बोलणे झाले. सुरुवातीला लोकदलाच्या अधिपत्याखाली धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही सुनील सिंह यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)>समेट अशक्यचलोकदलाची स्थापना माजी पंतप्रधान चरण सिंह यांनी १९८० मध्ये केली होती. मुलायमसिंह हे संस्थापक सदस्य होते. शिवपाल यांच्या निकटवर्ती नेत्याने सांगितले की, अखिलेश आणि शिवपाल गटांत समेटाची शक्यता दिसत नाही. तेव्हा शिवपाल यांना आपल्या राजकीय भवितव्याचा निर्णय घ्यावा लागणार असून, धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन होणार, हे निश्चित.
मुुलायम, शिवपाल यांचा नवा पक्ष, लोकदलाच्या झेंड्याखाली वेगळी आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 4:24 AM