ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २४ - हजारो नागरिक बेघर होण्यास कारणीभूत ठरलेल्या मुझफ्फरनगरमधील दंगलीसाठी समाजवादी पक्ष व भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचे न्या. विष्णू सहाय्य तपास आयोगाने म्हटले आहे. २०१३ साली मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीत ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर ५० हजारांहून अधिक नागरिक बेघर झाले होते. याप्रकरणी राज्य सरकारतर्फे न्या. विष्णू सहाय्य यांच्या नेतृत्वाखालील तपास आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने राज्यपाल राम नाईक यांच्याकडे सुपूर्त केलेल्या अहवालानुसार या दंगलीला सपा, भाजपासह पोलिस व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचा बेजबाबदारपणाही कारणीभूत होता. त्यांच्या चुकांमुळे मुझफ्फरनगरमध्ये दंगलीचे परिस्थिती निर्माण झाली व हिंसाचारही घडला, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुढील कारवाईसाठी हा अहवाल मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे पाठवण्यात येईल, असे राज्यपाल राम नाईक यांनी सांगितले. ' याप्रकरणाच्या तपासाचा पहिला अहवाल आयोगाने सुपूर्त केला असून त्यावर योग्य त्या कारवाईसाठी लवकरच हा अहवाल आम्ही राज्य सरकारकडे पाठवू' असे ते म्हणाले. न्या. विष्णू सहाय हे अलाहबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असून त्यांनी तयार केलेला ७७५ पानांचा अहवाल ६ भागांमध्ये विभागण्यात आला आहे. या अहवालात सामान्य नागरिक, सरकारी अधिकारी व राजकीय पक्षांच्या एकूण ३७७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत