मुजफ्फरपूर-
बिहार भाजपाचे उपाध्यक्ष आणि मुजफ्फरपूरचे खासदार अजय निषाद (MP Ajay Nishad) नेहमीच आपल्या हटके विधानांमुळे चर्चेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत त्यांनी केलेली भविष्यवाणी आता चर्चेचा विषय ठरत आहे. मोदींनंतर देशाचं पंतप्रधान कोण होणार याबाबत त्यांनी केलेलं एक विधान सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. यात अजय निषाद यांनी सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहात असल्याचं म्हटलं आहे.
तबलिगी जमात, मदरशांमधून दहशतवाद आणि खुल्या जागेत नमाजाच्या मुद्द्यावर बेडधक वक्तव्य करणारे मुजफ्फरपूरचे खासदार अजय निषाद यांनी देशाच्या भावी पंतप्रधानपदी योगी आदित्यनाथ यांना प्रोजेक्ट करुन पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ आणि मंत्री मुकेश सहनी यांच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात निषाद यांनी योगी आदित्यनाथ हेच देशाचे भावी पंतप्रधान होतील असं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे व्यापक जनाधार आहे आणि ते भाजपाचे उद्योन्मुख तारे आहेत. ते भावी पंतप्रधान म्हणून आपल्याला पाहायला मिळू शकतात, असं निषाद यांनी म्हटलं आहे. दरम्यान, निषाद यांच्या वक्तव्यावर भाजपाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.