बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये लग्नानंतर नवरीला सोडून नवरा पळून गेला. कुटुंबीयांनी बराच शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसात तक्रार करण्यात आली. तपास करत असताना पोलिसांनी आरा रेल्वे स्थानकावर एका ट्रेनमधून नवऱ्याला ताब्यात घेतलं. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अहियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील शहबाजपूर येथील आहे. शाही आदित्य उर्फ शुभमचं चार फेब्रुवारी रोजी बोचाहा पोलीस ठाण्याच्या मझौली येथे लग्न झालं. मंगळवारी सायंकाळी आदित्यने त्याच्या कुटुंबीयांना पाच मिनिटांत येतो असं सांगितलं आणि घराबाहेर पडला. काही वेळाने त्याचा मोबाईल बंद झाला. शुभम हा बँकेत कर्मचारी आहे.
घरच्यांनी थोड्यावेळाने पाहिलं असता शुभम घरी नव्हता. खूप शोधाशोध केली, पण सापडला नाही. कुटुंबीय तक्रार घेऊन पोलिसात पोहोचले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि शुभमच्या शोधात टीम निघाली. पोलिसांनी मोबाईल सर्व्हिलन्स आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला.
पोलिसांनी 36 तासांत शुभमला शोधलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, शुभमने वैयक्तिक कारणं तसेच मानसिक तणावाबाबत सांगितलं. आरा रेल्वे स्टेशनवर शुभम बंगळुरूला जाणाऱ्या ट्रेनमध्ये सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याला मुजफ्फरपूरला आणलं.
मुझफ्फरपूरचे एएसपी टाऊन भानू प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून फरार झालेल्या तरुणाला ट्रेनमधून पकडण्यात आलं आहे. मुझफ्फरपूर पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचा शोध सुरू केला होता. घरातून पळून जाण्यामागे त्याने केवळ वैयक्तिक कारणं आणि मानसिक तणावाचं कारण सांगितलं आहे.
एएसपीने सांगितले की, घरातून गायब झाल्यानंतर तरुणाने बैरिया येथील एटीएममधून 40 हजार रुपये काढले होते. याचे पुरावे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरून मिळाले आहेत. यानंतर शोध सुरू झाला. सध्या परिसरात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.