मुजफ्फरपूरः मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुलं पत्र लिहिणाऱ्या विविध क्षेत्रांतील 50 मान्यवरांविरोधात दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा खटला बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बिहारच्या मुजफ्फरपूरमधल्या एसएसपींनी या मान्यवरांविरोधात दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाचा खटला रद्द करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता त्या मान्यवरांविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार नाही. दुसरीकडे स्थानिक वकील सुधीर कुमार ओझा यांनी दोन महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली होती, त्या याचिकेवरून मुख्य न्यायदंडाधिकारी(सीजेएम) सूर्यकांत तिवारींच्या आदेशानंतर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. ओझानं सांगितलं की, 20 ऑगस्ट रोजी मी याचिका दाखल केली, त्यानंतर मुजफ्फरपूर पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आलं. दरम्यान, देशभरात वाढत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील 50 मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. त्या पत्रांमध्ये मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच देशात असंतोषाचे दमन होणार नाही, असे वातावरण निर्माण करण्याची विनंती या मान्यवरांनी नरेंद्र मोदींना केली होती. त्यानंतर त्या मान्यवरांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणाऱ्या मान्यवरांमध्ये मणिरत्नम, अडूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 50 जणांचा समावेश आहे. देशामध्ये निर्माण होणाऱ्या असंतोषाचे वातावरण न निवळता त्याला मोकळी वाट मिळेल, असे वातावरण निर्माण करावे. तसेच हा देश एक प्रबळ राष्ट्र बनावे, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांना करण्यात आली होती. तसेच जय श्रीराम हे आज भडकावणारे वाक्य बनले आहे. श्रीराम हे बहुसंख्याक समुदायासाठी पवित्र आहेत. त्यामुळे राम नामाचे राजकारण बंद करावे. देशभरात दलितांवरील अत्याचाराच्या 840 घटना घडल्या आहेत. यावर काय कारवाई झाली याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे, अशी विचारणाही या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली होती.
मोदींना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' 50 मान्यवरांविरोधातील देशद्रोहाचा खटला बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 9:19 PM