नवी दिल्ली- मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे याचा पुनरुच्चार केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी केला आहे. चार्ल्स डार्विनचा सिद्धांत येत्या 20 वर्षांत चुकीचा सिद्ध होईल. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्याकारणानं मला असं वाटतं मी माझे पूर्वज माकड नव्हते, असं सत्यपाल सिंह म्हणाले आहेत, एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम सोहळ्यात ते बोलत होते.कोणत्याही व्यक्तीला दुस-यांच्या विचारांची चेष्टा करण्याचा वैज्ञानिक अधिकार नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपा खासदार सिंह म्हणाले, मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी राहिलो आहे. मी रसायन शास्त्रात पीएचडी केलं आहे. माझ्याविरोधात बोलणारे कोण होते ?, माझ्याबरोबर बरेच लोक असून, आपण सर्वांनाच याचा विचार करावा लागणार आहे. आज नव्हे, तर उद्या आणि उद्याही नाही, तर 10 ते 20 वर्षांत लोकांच्या माझ्या विधानावर विश्वास बसेल. मला असं वाटतं, माझे पूर्व माकड नव्हते, असंही सिंह यांनी सांगितलं आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीही डार्विनच्या सिद्धांतावर सत्यपाल सिंह यांनी टिपण्णी केली होती.आपल्या पूर्वजांपासून ते आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये किंवा पुस्तकांमध्ये वानरापासून मानवाची निर्मिती झाली असे कुणीच म्हणालेले नाही. कुणी मनुष्य जंगलात गेला व त्याने तिथे वानरापासून मनुष्याची निर्मिती झाली आहे, असे कोणी पाहिले आहे काय, तसा दावाही कुणी केलेला नाही. मात्र, आम्हाला शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात डार्विन या शास्त्रज्ञाचा तो सिद्धांत शिकविला जातो. डार्विनचा विज्ञानातील हा सिद्धांत खोटा आणि अत्यंत चुकीचा आहे. माणसाची उत्क्रांती वानरांपासून झाली नाही, हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी विदेशात 35 वर्षांपूर्वीच सिद्ध केल्याचा दावाही डॉ. सिंग यांनी केला. त्यांच्या मुलांना जंगलात नेऊन सोडासत्यपाल सिंह यांचे आणखी एक गमतीशीर विधान केले होते. ते म्हणाले होते, ‘काही शास्त्रज्ञ असे म्हणतात की, पशू, पक्षी आणि जनावरांचा आवाज ऐकून मनुष्य भाषा बोलण्यास शिकला. मी म्हणतो की, असे बोलणार्यांच्या मुलांना काही वर्ष जंगलात नेऊन सोडा. बघू, तेथील पशू, पक्ष्यांच्या आवाजावरुन ते कोणती भाषा शिकतात ते’. सूर्य, पृथ्वी, चंद्राच्या निर्मितीनंतर भगवंतांनी वेदवाणी केली व जगातला मुनष्य तेच वेद पहिले शिकला, असेही ते बोलून गेले. ईश्वराच्या ज्ञानरुपी गंगेतून मनुष्य वेद म्हणण्यास शिकला. हे सत्य आहे, असा दावा त्यांनी केला.
माझे पूर्वज माकड नव्हते, भाजपाच्या मंत्र्यांचा हास्यास्पद दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 8:20 AM