आसाममध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनंतर, गुवाहटीमध्ये 150 हून अधिक काँग्रेस आणि ऑल आसाम स्टूडेंट्स युनियनच्या (AASU) कार्यकर्त्यांनी रविवारी भारतीय जनता पार्टी अर्थात भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मंत्री बिस्मिता गोगोई, माजी विधानसभा अध्यक्ष जीबा कांता गोगोई यांची मुलगी, आसाम प्रदेश काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष अंजन दत्ता यांची मुलगी अंगकिता दत्ता आणि एएएसयचे माजी अध्यक्ष दीपांका कुमार नाथ यांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या या नेत्यांनी आसाम भाजप मुख्यालयात राज्य भाजपाध्यक्ष भाबेश कलिता आणि मंत्री पीयूष हजारिका तथा जयंत मल्ला बरुआ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. महत्वाचे म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मणिपूर ते गुजरात भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून गेल्यानंतर या नेत्यांनी काँग्रेसला टा-टा बाय-बाय केला आहे.
महिला नेत्यानं बोलून दाखवलं दुःख -द हिंदूच्या एका वृत्तानुसार, आता काँग्रेसमध्ये महिला सुरक्षित नाहीत, म्हणून आपण राजकीय रंग बदलला आहे, असे काँग्रेस नेत्या गोगोई यांचे म्हणणे आहे. "माझे ब्लाउजही काँग्रेसमध्ये चर्चेचा विषय बनले होते. मी नाव घेऊ शकत नाही. पण एक काँग्रेस नेता म्हणाला की, मी भाजपामध्ये प्रवेश करणार, कारण माझ्या ब्लाउजवर कमळाचे फूल आहे. त्यामुळे, जो पक्ष महिलांचा सन्मान करू शकत नाही, अशा पक्षासोबत राहण्यात काहीही अर्थ नाही, असे गोगोई यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी राज्यात होत असलेल्या विकास कामांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे कौतुकही केले.
राहुल गांधी यांच्या यात्रेचा मोठा प्रभाव पडला आहे -मंत्री पीयूष हजारिका यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, 150 हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली. त्यांनी रविवारी एक्सवर लिहिले की, 'मला हे मानावे लागेल की राहुल गांधी यांच्या भारत बस न्याय यात्रेने आसाममध्ये मोठा प्रभाव पाटला आहे. आसाम काँग्रेस आणि AASU च्या 150 हून अधिकन नेत्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अंकिता दत्ता, बिस्मिता गोगोई आणि दीपांक कुमार नाथ यांनी चांगाला निर्णय घेतला आहे.'
लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला नेत्यानेही काँग्रेस पक्ष सोडला -महत्वाचे म्हणजे,यूथ काँग्रेस आसामच्या माजी अध्यक्ष दत्ता यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर, एप्रिल 2023 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने (AICC) 'पक्षविरोधी कारवाई'चा ठपका ठेवत त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले होते.