कोणत्याही संकटात काही लोक संधीसाधूपणा करतात, फायदा पाहतात. पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूटच्या (SII) कोविशिल्ड कोरोना लसीला (Corona Vaccine) जगभरातून जोरदार मागणी आहे. भारतात दिली तर कमी रुपयांत आणि जगभरात दिली तर ते देश सांगतील त्या किंमतीला विकत घेतील अशी परिस्थिती आहे. मात्र, सीमरचे सीईओ अदार पुनावाला यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (SerumInstIndia has been directed to prioritise the huge needs of India and along with that balance the needs of the rest of the world. We are trying our best.: adar poonawalla)
जगभरातून मोठी मागणी असल्याने सीरमकडे अनेक देशांकडून सारखी विचारणा होत आहे. कोरोना लस कधी देणार, असे प्रश्न विचारले जात आहेत. यावर पुनावाला यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. 'आदरणीय देश आणि सरकारे, जसे की तुम्ही लोक कोविशिल्ड लसीच्या पुरवठ्याची वाट पाहत आहात. मी तुम्हा सर्वांना विनम्रतेने निवेदन करतो की, तुम्ही सर्वांनी धीर धरावा. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने भारतातील कोरोना लसीकरणाच्या गरजांना प्राथमिकता देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर अन्य देशांच्या मागण्याही पूर्ण करण्यासाठी संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहोत.', असा संदेश त्यांनी जगाला दिला आहे.
सीरम इन्स्टीट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडनची कंपनी एस्ट्राझिनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन घेत आहे. सीरम भारत सरकारसोबत अन्य बाजारांसाठीही कोरोना लस बनवत आहे. केंद्र सरकारला जुलैपर्यंत ३० ते ४० कोटी डोस द्यायचे आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या योजनेनुसार देशातील २० ते ३० टक्के लोकसंख्येला कोरोना लस टोचायची आहे. ऑक्टोबरपर्यंत देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येला कोरोना लस दिली जाणार आहे. तेव्हाच लोकांचे आयुष्य पूर्वीसारखे सामान्य होणार आहे.
भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. अशावेळी कोरोनाचा उद्रेक थोपविण्यासाठी देशात कोरोना लसीची मोठी गरज आहे. देशात खरी गरज असताना भारताने जगाशी असलेले देणे न विसरता कोरोना लस विविध देशांना पुरवत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांना भारताने दोन लाख कोरोना लसीचे डोस देऊ केले आहेत.