कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील करौली आश्रमचे बाबा संतोष भदौरिया, एका भक्तासोबत झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर चर्चेत आले. काही वर्षांपूर्वीपर्यंत शेतकरी नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र, काही वर्षांत संतोष भदोरिया यांनी कोट्यवधींची संपत्ती जमवली. बाबांच्या आश्रमात दररोज तीन ते चार हजार भाविकांची गर्दी होते. तर, आश्रमात भाविकांना १०० रुपयांची पावतीदेखील फाडावी लागते. आता, या बाबांनी वेगळीच घोषणा केलीय. ज्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरांना फीज आणि असाध्य रोगाच्या उपचारासाठी पैसे देतात, त्याप्रमाणे आम्हालाही पैसे द्यावे लागतील. १ एप्रिलपासून या बाबांनी यज्ञ, होमहवनची फीही वाढवली आहे.
करौली बाबा संतोष सिंह भदोरिया यांच्यावर एका भक्तानं मारहाणीचा आरोप केलाय. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. बाबा आणि त्या व्यक्तीमध्ये वाद सुरू असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओनंतर बाबा सोशल मीडियातून चर्चेत आले. त्यानंतर, आपल्या दरबारात येणाऱ्या भाविकांकडून ते प्रत्येकी १०० रुपये फी घेतात हेही मीडियात आले. त्यासंदर्भात आता बाबांनी डॉक्टरांचे उदाहरण दिले आहे. लोक डॉक्टरांना फीज देतात, मोठ्या रोगावरील उपचारांसाठी ते डॉक्टरांकडे जातात, तिथे लाखो रुपये खर्च करतात. त्याचप्रमाणे येथेही फी घेतली जाते. यापुढे, तात्काळ लाभ मिळवण्यासाठी करण्यात येणाऱ्या होम-हवनसाठी १ एप्रिलपासून २.५ लाख रुपये फी घेण्यात येईल, अशी घोषणाच बाबांनी केलीय. यापूर्वी ही फी १.५ लाख रुपये होती. दरम्यान, बाबांनी हे रागारागात म्हटलंय, असाही काही भक्तांनी खुलासा केलाय.
बाबांच्या आश्रमात कोट्यवधी रुपयांची वाहनं आहेत. ते ज्या कारमधून प्रवास करतात त्याची किंमत अडीच कोटी रुपये आहे. आश्रमात उभी केलेली इतर वाहने त्यांच्या ताफ्याचा भाग असतात. यामध्ये त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि बाउन्सर प्रवास करतात. तर, बाबांच्या आश्रमात देशी असल्याचे सांगत घरगुती वस्तूंची विक्रीही होते. आश्रमात देशी गायीचे तूप १८०० रुपये किलो दराने विक्री केले जाते. तर, २३० रुपयांत अर्धा लिटर गुलाब जल दिले जाते. बटाटा फेस पॅक आणि उटणे फेसपॅकही येथे विक्री केले जाते. या सर्वांचे उत्पादन नेमके कोठे होते हेही अद्याप गुलदस्त्यात आहे.