तिनसुकिया : आसामच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही देतानाच आपला लढा मुख्यमंत्री तरुण गोगई यांच्याशी नसून, काँग्रेसशासित राज्यातील गरिबी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. मोदी यांनी आसाममध्ये दोन जाहीर सभा घेतल्या. त्यापैकी तिनसुकियातील सभेत मोदी म्हणाले, माझे तीन अजेंडा आहेत. विकास, जलद विकास आणि सर्वांगीण विकास. आमच्या सरकारने राज्यात पायाभूत संरचनेच्या विकासासाठी यापूर्वीच्या सरकारच्या तुलनेत कितीतरी पट जास्त निधी दिला आहे. ७० वर्षीय गोगई यांनी राज्यातील निवडणुका म्हणजे मोदी आणि आपल्यातील थेट मुकाबला असल्याचे म्हटले होते. त्यांची फिरकी घेताना मी फक्त या वयोवृद्ध नेत्याप्रती आदर व्यक्त करू शकतो, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी दिली. ते म्हणाले, नव्वदीला आलेले काँग्रेसचे नेते त्यांची लढाई मोदींसोबत असल्याचे सांगत आहेत. आदरणीय मुख्यमंत्रीजी आपण वरिष्ठ आणि मी लहान आहे. मी तुमच्याबद्दल आदर व्यक्त करू शकतो. कारण आमच्या संस्कृतीत लहान कधीच मोठ्यांसोबत लढत नाहीत आणि ज्येष्ठ लहानांना आशीर्वाद देतात.राज्यातील भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वानंद सोनोवाल यांची मोदींनी प्रशंसा केली. घुसखोरीसारख्या किचकट मुद्याचा उल्लेख करायचे त्यांनी टाळले. विशेष म्हणजे भाजपाप्रणीत रालोआचा हा निवडणुकीतील मुख्य मुद्दा आहे. विकासाचे महत्त्व आणि आसामची पाहिजे तशी प्रगती न होणे याकडेच पंतप्रधानांनी प्रामुख्याने लक्ष वेधले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच समृद्ध राज्यांमध्ये आसामची गणना होत होती. परंतु आता मात्र त्याचा पाच अल्प विकसित राज्यांमध्ये समावेश झाला असून याला काँग्रेसचे सरकार जबाबदार आहे,असा आरोप त्यांनी केला. (वृत्तसंस्था)
माझा लढा गरिबी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध
By admin | Published: March 27, 2016 12:08 AM