नवी दिल्ली/मुंबई - आपलं हक्काचं घर हे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं. चार पत्र्यांची खोली असावी पण त्याची मालकीन मी असावी अशी भावना प्रत्येकाच्या मनात असते. कारण, त्या घरात आपलं आयुष्य, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण साजरे होत असतात. त्या चार भिंतीसोबत आपलं जिव्हाळ्याचं, प्रेमाचं, आनंदाचं अन् दु:खाचंही नातं असतं. म्हणूनच प्रत्येकाला हक्काच एक घर हवं असते. तामिळनाडूतील मदुराई येथील सुब्बुलक्ष्मी यांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून हक्काचं घर मिळालं. स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या सुब्बुलक्ष्मी यांचं हे स्वत:च घर झाल्याने त्यांना अत्यानंद झाला. आपला आनंद त्यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदींना पत्र लिहून शेअर केलाय. विशेष म्हणजे मोदींनी ते पत्र त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही शेअर केलं आहे.
पंतप्रधान,नरेंद्र मोदी यांनी एन.सुब्बुलक्ष्मी यांचे एक हृदयस्पर्शी पत्र शेअर केले आहे. या पत्रात, सुब्बुलक्ष्मी यांनी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. प्रसार भारतीचे माजी बोर्ड सदस्य सी.आर.केसवन यांची, नवी दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी आपण भेट घेतल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. त्यावेळी, केसवन यांनी एन. सुब्बुलक्ष्मी यांचे पत्र पंतप्रधानांना दाखवले. सुब्बुलक्ष्मी या मदुराई इथल्या असून, त्या सी. आर. केसवन यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करतात. त्यांनी आपल्या घराचे फोटो शेअर केले असून, कृतज्ञता व्यक्त करत आशीर्वाद दिले आहेत. यासंदर्भात मोदींनी ट्विट करुन माहिती दिली.
पंतप्रधानांनी केले ट्वीट
“आज मी @crkesavan यांना भेटलो. त्यांनी एन.सुब्बुलक्ष्मी जी, ज्या त्यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करतात, त्यांचे एक अतिशय हृदयस्पर्शी पत्र शेअर केले आहे. मदुराई इथल्या एन. सुब्बुलक्ष्मीजी यांना आर्थिक समस्यांसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांनी पीएम आवास योजने अंतर्गत घरासाठी यशस्वीपणे अर्ज केला.”
“त्यांच्या पत्रात एन. सुब्बुलक्ष्मी जी यांनी हे देखील सांगितले की, हे त्यांचे पहिलेच घर आहे,आणि त्याने त्यांच्या जीवनात आदर आणि प्रतिष्ठा देखील आणली आहे. त्यांनी आपल्या घराची छायाचित्रे शेअर केली आहेत, आणि कृतज्ञता व्यक्त करत आशीर्वाद दिले आहेत. हे असे आशीर्वाद आहेत, जे शक्तीचा मोठा स्रोत आहेत. “एन.सुब्बुलक्ष्मीजीं प्रमाणेच असे असंख्य लोक आहेत, ज्यांचे जीवन पीएम आवास योजनेमुळे बदलले आहे.घरामुळे त्यांच्या जीवनात गुणात्मक फरक पडला आहे.ही योजना महिला सक्षमीकरणामधेही आघाडीवर आहे.”, असे मोदींनी म्हटले आहे.