नवी दिल्ली, दि. 5 - उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठया मताधिक्क्याने विजय मिळवल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी त्यांना पाठिंबा देणा-या सर्व खासदारांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा आज देशाचा उपराष्ट्रपती होतोय हा माझा सन्मान आहे. देशाच्या संविधानाला सर्वोच्च मानून आणि माझ्या पूर्वसुरींनी ज्या परंपरा, मापदंड घालून दिलेत त्यानुसार काम करीन असे व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या विजयानंतर बोलताना सांगितले.
निकाल जाहीर झाला त्यावेळी नायडू दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी होते. यावेळी कुटुंबियांसह भाजप आणि अन्य पक्षाच्या नेत्यांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयानंतर लगेचच नायडू यांना टि्वटरवरुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी माझ्या मनात नायडू यांच्यासोबत पक्ष, सरकारमध्ये जे काम केले त्या आठवणी आहेत. नायडू आपली भूमिका योग्यरीतीने पार पाडतील आणि राष्ट्र निर्माणामध्ये योगदान देतील याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे असे मोदी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.