दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाचं प्रकरण सातत्यानं जोर धरत आहे. नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मुख्य सचिवांकडून या प्रकरणाची फाईल मागितली आहे. किंबहुना, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या देखभालीवर ४५ कोटी खर्च केल्याचा आरोप करत भाजप सातत्यानं अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत आहे. दरम्यान, नायब राज्यपाल सक्सेना यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांकडे संबंधित फाइल मागितल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. नायब राज्यपालांच्या घरावरही कोट्यवधी खर्च करून नूतनीकरण करण्यात आल्याचा आरोपही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, यावर उत्तर देताना नायब राज्यपालांनी आपलं घर माध्यमांसाठी खुलं असल्याचं म्हटंल. “तुम्ही हवं तेव्हा येऊन पाहू शकता, कितीचं रिनोवेशन करण्यात आलंय. माझं घर सामान्य लोकांसाठी खुलं आहे. व्हिडीओग्राफीही करू शकता. आम आदमी पक्ष जो दावा करतो, माझ्या घरात १५ कोटींचं रेनोवेशन झालंय. तसं नाही. मी अहवाल मागवलाय (मुख्यमंत्री निवासस्थान) मला जी कारवाई करायची होती मी केली. आता मुख्य सचिव अहवाल सोपवतील,” असं ते म्हणाले.
भाजपकडून हल्लाबोलमीडिया रिपोर्ट्सनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ८ लाख रुपयांचे पडदे लावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर, मार्बल बसवण्यासाठी १ कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. सदर मार्बल व्हिएतनामवरून आणल्याचा दावा केला जात आहे. घरात जे गालिचे टाकले आहेत, त्याची किंमतही लाखोंच्या घरात आहे. यावरून भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.