यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 02:00 PM2024-11-07T14:00:26+5:302024-11-07T14:02:19+5:30
भाजपा सरकार २०१९ पासून यासीन मलिकचा छळ करत आहे असा आरोप मलिकच्या पत्नीने केला. मलिकवर ३५ वर्ष जुन्या प्रकरणात भारताविरोधात हल्ला करण्याचा आरोप आहे
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासीन मलिकची पत्नी मुशाल हुसैन मलिक यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहिलं आहे. यासीन मलिक सध्या जेलमध्ये बंद असून त्याच्या सुटकेचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याची मागणी मुशालने राहुल गांधींकडे केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यात यासीन मलिक महत्त्वाची भूमिका निभावू शकतात असा दावा त्याची पत्नी मुशाल हुसैनने राहुल यांच्याकडे केला आहे.
मानवाधिकार आणि महिला सशक्तीकरण मुद्द्यांवर पाकिस्तानी पंतप्रधानाच्या माजी सहायक असलेल्या मुशाल हुसैन यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून ३ दशक जुन्या देशद्रोहाच्या प्रकरणी मलिकविरोधात सुरु असलेल्या खटल्याकडे लक्ष वेधले. या खटल्यात एनआयएकडून मलिकला आजीवन कारावासाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. NIA ने २०१७ साली या प्रकरणी मलिकसह अन्य दोषींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. २०२२ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
यासीन मलिक जेलमधील अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ २ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाला बसला आहे. या उपोषणामुळे मलिक याच्या प्रकृतीवर आणखी विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे ज्या व्यक्तीने शस्त्रे सोडून अहिंसेचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे त्या व्यक्तीचा जीव धोक्यात येईल असं मुशालने राहुल गांधींना पत्रात कळवलं आहे. त्याशिवाय भाजपा सरकार २०१९ पासून यासीन मलिकचा छळ करत आहे. मलिकवर ३५ वर्ष जुन्या प्रकरणात भारताविरोधात युद्ध पुकारण्याचा आरोप आहे. त्यात राहुल गांधींनी संसदेत त्यांचा उच्च नैतिक आणि राजकीय प्रभाव वापरावा आणि यासिन मलिकच्या प्रकरणावर चर्चा करावी. ते केवळ दिखाव्यासाठी नव्हे तर जम्मू-काश्मीरमध्ये खरी शांतता राखण्याचे माध्यम बनू शकतात असा दावा मुशालने पत्रात केला आहे.
मुशालच्या पत्रामुळे काँग्रेस अडचणीत?
मुशाल हुसेनच्या या पत्रामुळे काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे. १८ वर्षापूर्वी २००६ मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यासीन मलिक यांची भेट झाली होती, ते फोटो पुन्हा व्हायरल झालेत. अद्याप काँग्रेस आणि राहुल गांधींनी मुशाल हुसेनच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली नाही. यासीन मलिक सध्या तिहाडच्या जेलमध्ये बंद आहे. काश्मीरमधील फुटिरतावादी नेता जो भारताविरोधात अनेक कारस्थाने करून हल्ले करायचा. १९९० च्या काश्मीरमधील हिंसाचारात त्याचा मोठा हात होता. २०२२ मध्ये टेरर फंडिग प्रकरणी यासीनला जन्मठेपेची शिक्षा झाली. यासीन मलिकवर १९९० साली श्रीनगरच्या रावलपोरामध्ये भारतीय हवाई दलाच्या ४० कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यात ४ जवान शहीद झाले होते.