भोपाळ : निवडणूक आयोगाच्या आदेशांवरून भोपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. यावेळी एका व्यक्तीला पोलिसांनी रोखले, तेव्हा या महाभागाने थेट मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा भावोजी असल्याचे पोलिसांना सांगत हुज्जत घातली. हा व्हिडिओ सर्वत्र पसरल्यावर शेवटी मुख्यमंत्र्यांनाच याबाबतचा खुलासा करावा लागला. तोपर्यंत पोलिसांनीही या महाभागाविरोधात कोणतीही कारवाई केली नव्हती हे विशेष.
भोपाळमधील जेल रोडवर पोलिसांनी वाहने तपासणी सुरु केली होती. यावेळी एका कार चालकाला थांबवून त्याच्याकडून पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली. त्याच्या शेजारी बसलेल्या गजेंद्र सिंह चौहान नावाच्या व्यक्तीने पोलिसांना मुख्यमंत्री शिवराजसिंह माझे मेहुणे आहेत, असे सांगितले. यावर त्या पोलिसांनी हे गाडीत बसलेल्या आपल्या साहेबांना सांगण्यास सांगितले. यावर गजेंद्र भडकले आणि त्यांनी वाहतूक पोलिसाचा हात पकडला. तसेच कारमध्ये बसलेल्या महिलेला पायातील चप्पल काढण्यास सांगितले.
हा प्रकार पाहून तपासणीसाठी असलेले पोलीस जमा झाले. या प्रकारावर जवळपास 2 तास बाचाबाची सुरु होती. या प्रकाराची कल्पना डीएसपी मधुकर चौकीकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारण होते खुद्द मुख्यमंत्र्यांची ओळख सांगितल्याचे. त्यांनी दोन्ही बाजुंना समजावत या व्यक्तीवर कारवाई न करताच प्रकरण शांत केले. तोपर्यंत या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर पसरला होता.
यामुळे मुख्यमंत्र्यांवर टीका होऊ लागल्याने शेवटी शिवराजसिंह चौहान यांना या बाबत खुलासा करावा लागला. राज्यातील करोडो महिला माझ्या बहिणी आहेत, या नात्याने मी अनेकांचा मेहुणा लागतो, असा खुलासा त्यांनी केला. यानंतर हायसे वाटलेल्या पोलिसांनी कारच्या मालकाला तीन हजार रुपयांची दंडाची पावती पाठवून दिली.