नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलांसह अनेक महिलांचा मृत्यू झाला आहे. पप्पू गुप्ता या तरुणाने आपली आई गमावली आहे. चेंगराचेंगरीत त्यांच्या आईचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. बिहारमधील पप्पू गुप्ता त्याच्या कुटुंबासह बिहारला जात होता आणि जेव्हा ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा तो प्लॅटफॉर्मवर उपस्थित होता. यात त्याच्या आईचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत.
पप्पू गुप्ता म्हणाला की, जेव्हा ते प्लॅटफॉर्मवर बिहारला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते तेव्हा तिथे फारशी गर्दी नव्हती. पण अचानक कुठूनतरी हजारो लोक आले आणि गर्दी इतकी वाढली की चेंगराचेंगरी झाली. माझ्या डोळ्यांसमोर लोक एकमेकांवर चढत पुढे जात होते आणि मला काय चाललं आहे ते समजत नव्हतं. या काळात बरेच लोक पडले.
अपघातानंतर त्याच्या आईला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिची प्रकृती गंभीर होती, म्हणून तोही तिच्यासोबत गेला. नंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं की, त्याच्या आईचं निधन झालं आहे. पत्नीची प्रकृतीही खूप वाईट आहे आणि आई आता आपल्यात नसल्याने ती या दुःखातून बाहेर पडू शकत नाही. या घटनेच्या वेळी ते सर्व एकत्र होते. बिहारमधील पाटणा येथील रहिवासी पप्पू हे जखमी प्रवाशांपैकी एक आहेत. माझ्या आईचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. आम्ही घरी जात होतो असं सांगितलं.
रेल्वे बोर्डने रविवारी सांगितले की, शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमागील कारणं शोधण्यासाठी आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये सुमारे १८ जणांना आपला जीव गमवावा लागला.
प्रचंड गर्दी! हालायलाही अजिबात जागा नाही...; चेंगराचेंगरी आधीचा रेल्वे स्टेशनवरील Video व्हायरल
घटनेच्या आधीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये स्टेशनवर किती गर्दी आहे हे दिसून येतं. लोकांना हालायलाही अजिबात जागा नाही. व्हिडीओमध्ये प्रयागराजला जाण्यासाठी सगळेच उत्सुक दिसत आहेत पण त्यांना कल्पना नव्हती की काही मिनिटांत स्टेशनवर चेंगराचेंगरी होईल. प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी ट्रेन पकडण्याच्या आशेने प्रवाशांची मोठी गर्दी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर पोहोचली तेव्हा ही घटना घडली. महाकुंभाला जाण्यासाठी गाड्या पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली, ज्यामुळे गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला. याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली.