बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बिहारबद्दलचे त्यांचे नितांत प्रेम व्यक्त केले. आपल्या आत्म्यात बिहार वसतो आणि आपला पुढचा जन्म बिहारमध्येच व्हावा अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी बिहारचे वर्णन 'मोक्ष आणि ज्ञानाची भूमी' असे केले. धार्मिक विधीसाठी ते सध्या २०० अनुयांसह बिहारमधील गया येथे आहेत. बिहार हे एक अद्भुत राज्य असून, बिहारची खूप आवड आहे. माझा पुढचा जन्म बिहारमध्येच व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझा आत्मा बिहार असून, बिहार ही मोक्षभूमी आणि ज्ञानभूमी आहे, असे धीरेंद्र शास्त्री यांनी नमूद केले.
दरम्यान, यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी दुसरे बागेश्वर म्हणून बिहारचा उल्लेख केला. बिहारचे माझ्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी मी वारंवार इथे येत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, काहीजण आमच्यावर कसलेही आरोप करतात. त्यांना मी सांगू इच्छितो की, मी काल होतो तसाच आज आहे आणि उद्या देखील असेन. काहीही टिप्पणी करणाऱ्यांनी प्रभू रामालाही सोडले नाही. प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार बोलत असतो. ज्याचे काम होईल तो सत्कार करेल आणि ज्याचे काम होणार नाही ती मंडळी ढोंगी असे संबोधेल.
टीकाकारांना प्रत्युत्तर तसेच आम्ही केवळ एका धार्मिक विधीसाठी गया येथे आलो आहोत. यामध्ये २०० अनुयायी सहभागी झाले आहेत. आम्ही इथे पिंडदान कार्यक्रमासाठी आलो आहोत. बागेश्वर धामशी संबंधित आलेल्यांना राहण्याची पावती मिळाली आहे. त्या पावतीच्या आधारे ते लोक येथे राहत आहेत. ते बागेश्वर धाम येथील कुटुंबीय आहेत. त्यामुळे त्यांना भेटणे ही माझी प्रमुख जबाबदारी आहे. पैसे घेऊन दरबार भरवला असे म्हणणारे लोक समजूतदार नाहीत असे मला वाटते, अशा शब्दांत धीरेंद्र शास्त्रींनी टीकाकारांचा समाचार घेतला.