नवी दिल्ली - जे काँग्रेस नेते माझा अपमान करत आहेत, माझ्याविरोधात असभ्य भाषा वापरत आहेत, माझे आई-वडिल कोण आहेत विचारतात त्यांना मला सांगायचं आहे की, हा देशच माझं सर्वस्व आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशाला आणि 125 कोटी भारतीयांना वाहिलेला आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. काँग्रेस नेत्यांकडून होणा-या टिकेवर बोलताना नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं आहे.
'काँग्रेसमध्ये एक तरुण नेता आहे सलमान निझामी नावाचा, जो काँग्रेससाठी गुजरातमध्ये प्रचार करत आहे. त्याने ट्विटरवर राहुल गांधींचे वडिल आणि आजीबद्दल लिहिलं आहे. इथपर्यंत ठीक आहे, पण त्याने विचारलं की, मोदी तुमची आई कोण आहे का सांगा ? वडिल कोण आहेत ? आपल्या शत्रुंसाठी ही भाषा वापरली जाऊ शकत नाही', असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
'सलमान निझामीने आपल्या ट्विटरवरुन आझाद काश्मीरची मागणी केली आहे. त्याने आपल्या लष्कर जवानांनी बलात्कारी म्हटलं आहे. सलमान निझामीसारख्या लोकांना कसं काय स्विकारलं जाऊ शकतं ? प्रत्येक घरातून अफजल निघेल असंही त्याने म्हटलं आहे', असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
'काँग्रेसला देशाने संपुर्णपणे नाकारलं आहे. गुजरातची जनतादेखील काँग्रेसला नाकारुन त्यांनी केलेल्या राजकारणाची शिक्षा त्यांना नक्की देईल', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यावेळी नरेंद्र मोदींनी काँग्रेसने मुस्लिमांना भरकटवलं असल्याचा आरोप केला. 'देशातील प्रत्येक भागात काँग्रेसने मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचं काम केलं आहे. त्यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची आश्वासने दिली, पण एकाही राज्यात ते पुर्ण केलं नाही', अशी विचारणा नरेंद्र मोदींनी केली.
आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत 9.77 टक्के मतदान झालं आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरु असणार आहे. आज 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान होत आहे. तर 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 89 जागा असून त्यांतील 53 जागा या ग्रामीण भागतील आहेत तर 36 जागा या शहरी भागातील आहे. सध्या ग्रामीण भागातील 53 जागांपैकी भाजपकडे 32 आणि काँग्रेसकडे 17 जागा आहेत. तर शहरी भागातील 36 जागांपैकी भाजपकडे तब्बल 31 आणि काँग्रेसकडे फक्त 5 जागा आहेत.