लोकसभा निवडणुकीचं शेवटच्या - सातव्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. या निवडणुकीचा जाहीर प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला. त्यानंतरही नेतेमंडळी वेगवेगळ्या मार्गाने मतदारांचं लक्ष वेधून घेण्याचे, सहानुभूती जिंकण्याचे प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच माझा 'पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर' (पीएसओ) माझी हत्या करू शकतो, माझं आयुष्य दोन मिनिटांत संपू शकतं, असं धक्कादायक विधान केजरीवाल यांनी पंजाब केसरीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.
माझ्या अवतीभवती जे सुरक्षारक्षक आहेत, ते सगळे भाजपाला रिपोर्ट करतात. भाजपाचे नेते माझ्या 'पीएसओ'करवी मला ठार मारू शकतात. माझ्या जिवाला त्यांच्यापासूनच धोका आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. या संबंधीचं वृत्त 'नवभारत टाइम्स'ने दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीआपली हत्या करवू शकतात, असा दावा केजरीवाल यांनी २०१६ मध्ये केला होता.
केजरीवाल म्हणाले, 'वाटलं होतं दिल्लीतील सर्व जागा जिंकू, पण ऐनवेळी...'
दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर, सुरक्षारक्षकांचं कवच असतानाही केजरीवाल यांच्यावर सहा वेळा हल्ला झाला आहे. परंतु, या निष्काळजीपणाबद्दल पोलिसांवर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, असं आम आदमी पार्टीचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं. थोडक्यात, केजरीवाल यांनी आपल्या दाव्यातून भाजपाला, मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. पंजाबमधील सर्व १३ लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच, केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हा गंभीर आरोप केला आहे.
आज सकाळी केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. दिल्लीतील सर्वच्या सर्व सात जागा आप जिंकेल, असं ४८ तास आधी आम्हाला वाटत होतं. परंतु, शेवटच्या क्षणी मुस्लिम मतं काँग्रेसकडे वळली. नेमकं असं काय झालं हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, असं सांगत त्यांनी काँग्रेसवर शरसंधान केलं होतं.