नवी दिल्ली : एनएसओ या इस्रायली कंपनीने विकसित केलेले पेगासस (Pegasus) सॉफ्टवेअर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांनी आपला मोबाईल फोन या हेरगिरी सॉफ्टवेअरद्वारे हॅक केल्याचा आरोप केला आहे. तिने आपल्या आयफोनवर आलेल्या अलर्टचा स्क्रीनशॉट शेअर करत हा दावा केला आहे. तसेच, इल्तिजा मुफ्ती यांनी भाजपवर हॅकिंगचा आरोप केला असून भाजप किती खालच्या थराला जाईल, असा सवाल केला आहे.
यासंदर्भात इल्तिजा मुफ्ती यांनी बुधवारी सोशल मीडियावरील एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये, एक अॅपल अलर्ट आला की, माझा फोन पेगाससद्वारे हॅक झाला आहे. पेगासस जे भारत सरकारने विकत घेतले आहे आणि टीकाकार व राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी शस्त्र बनवले आहे, असे इल्तिजा मुफ्ती यांनी म्हटले आहे. तसेच, आम्ही त्यांचे ऐकण्यास नकार देतो म्हणून भाजप निर्लज्जपणे महिलांची हेरगिरी करतो. भाजप अजून किती खालच्या थराला जाईल?" असेही इल्तिजा मुफ्ती यांनी पोस्टद्वारे म्हटले आहे.
काय आहे पेगासस सॉफ्टवेयर?पेगाससला इस्त्रायली सर्विलांस कंपनी NSO Group ने विकसित केले आहे. हे एक स्पायवेअर आहे. म्हणजेच याचा उपयोग कोणाच्याही हेरगिरीसाठी करता येईल. हे ऑनलाइन मिळणाऱ्या रँडम स्पायवेअरसारखे नाही. हे एक अतिशय अॅडव्हान्स आणि पॉवरफूल टूल आहे. हे पेगासस टूल प्रत्येकजण विकत घेऊ शकत नाही. हे फक्त सरकारबरोबर काम करते असा कंपनीचा दावा आहे. याचा वापर मॅक्सिको आणि पनामा या सरकारांकडून केला जात आहे. ही गोष्ट सार्वजनिक क्षेत्रात आहे.