नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेशमध्येकाँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणला होता. तेव्हापासून राज्यात राजकीय अस्थितरेचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांपैकी एक असलेल्या राजिंदर राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू आणि पक्ष नेतृत्वाला लक्ष्य केलं आहे.
राजिंदर राणा यांनी फेसबूकवर लिहिलं की, हिमाचलच्या माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो, मागच्या काही दिवसांपासून आपल्या देवभूमीमध्ये ज्या काही राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याची तुम्हाला बऱ्यापैकी जाणीव आहे. मला त्याबाबत वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. सगळी हकीकत तुमच्या समोर आहे. जे तुमच्यासमोर आलेलं नाही आणि ज्या बाबी षडयंत्रानुसार पडद्यामागे लपवण्यात आले, ते तुमच्यासमोर आणण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे. कारण माझी कटिबद्धता, माझी निष्ठा, माझं समर्पण, माझा विश्वास आणि माझी जबाबदारी तुमच्याशी आहे. सत्तेच्या शिखरावर बसलेल्या कुठल्याही खुज्या शहेंशाहसोबत नाही आहे.
राणा यांनी सांगितले की, हिमाचलमधील निवडणुकीदरम्यान आम्ही एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून तुम्हाला जे वचन दिले होते. ते तुम्हाला माहिती असेलच. तुम्ही आमच्या आश्वासनांवर विश्वास ठेवला. आम्हाला तुमचं बहुमूल्य मत देऊन आश्वासनं प्रत्यक्षात उतरवण्याची संधी दिली. देवभूमीची सेवी करण्याची संधी दिली. मात्र त्या आश्वासनांची सद्यस्थिती काय आहे, याबाबच मी आता लिहायला बसलो तर एक पुस्तक लिहून तयार होईल. ज्यांच्या हातात मी आनंदाने फुलांचा गुच्छ देऊन आलो होते. त्यांच्याच हातातील खंजीर माझी वाट पाहत आहे.
तुम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मी सुजानपूर येथून शिमला आणि शिमला येथून दिल्लीपर्यंत धावपळ केली. हात जोडून विनंती करत राहिलो. जी आश्वासनं दिली ती पूर्ण करा असं सांगत राहिलो. मात्र त्यावर ना शिमला येथील शहेनशाहच्या दरबाराता सुनावणी झाली, ना हस्तिनापूरच्या कमकुवत होत असलेल्या सिंहासनावरील सत्ताधाऱ्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले, अशी टीका राजिंदर राणा यांनी केली.