ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. ६ - बंगळुरुमध्ये एका अभियंत्याने दोन वर्षात रस्त्यावरुन तब्बल ३७ किलो खिळे गोळा केले आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल रस्त्यावर पडलेले खिळे गोळा करण्याचे कारण काय ? त्याचे असे झाले की, बेनीडीक्ट जेबाकुमार २०१२ मध्ये नोकरीसाठी म्हणून बंगळुरुमध्ये आले.
जेबाकुमार बानाशंकरी येथील आपल्या निवासस्थानाहून दररोज आउटर रिंग रोडवरुन दुचाकीने बेलांदूर येथील आपल्या कार्यालयात जातात. रोजच्या या प्रवासात ओआरआर मार्गावर वारंवार दुचाकी पंक्चर होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला त्यांना टायरमधल्या फॉल्टमुळे दुचाकी पंक्चर होत आहे असे वाटले.
त्यासाठी तो टायरला दोष देत होता. नंतर एकदिवस त्यांचे लक्ष रस्त्यावर पडलेल्या खिळयांवर गेले. त्यांनी खिळे गोळा केले. त्यावेळी सर्व खिळे एकाच प्रकारचे असल्याचे समजले आणि महत्वाचे म्हणजे टायरमधले पंक्चर काढणा-या दुकानांजवळ हे खिळे सापडले.
दोन वर्ष टायर वारंवार पंक्चर झाल्यानंतर त्याने परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. जुलै २०१४ पासून त्यांनी खिळे जमवायला सुरुवात केली. जेबाकुमार आधी हाताने खिळे उचलायचे. आता त्यांनी चुंबकीय काठी बनवली असून त्याने ते खिळे जमा करतात.
इनटयुट टेक्नोलॉजी सर्व्हीसेमध्ये ते इंजिनियर आहेत. दररोज सकाळी सात वाजता जेबाकुमार घर सोडतात आणि ठराविक जागेवर थांबून तो रस्ता खिळेमुक्त करतात. घरी परततानाही ते हेच काम करतात. जागरुकता निर्माण करणे हा जेबाकुमार यांचा उद्देश असून, जो पर्यंत प्रशासन पावल उचलत नाही तो पर्यंत मी काम थांबवणार नाही असे त्यांनी सांगितले.
ऑक्टोंबर २०१४ मध्ये त्यांना 'माय रोड, माय रिस्पॉनसिबलिटी' म्हणून फेसबुक पेज सुरु केले. या पेजवर ते फोटोंच्या माध्यमातून दररोज जमा केलेल्या खिळयांची माहिती देतात. २१ मार्चला एकाचदिवशी त्यांनी सर्वात जास्त १६५४ खिळे जमा केले. आतापर्यंत त्यांनी ३७ किलो खिळे गोळा केले आहेत.