श्रीहरी कोटा Chandrayaan 3 - देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-३च्या प्रक्षेपणासाठी बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हेईकल मार्क-३ (एलव्हीएम-३) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावर सज्ज झाले होते. सकाळपासूनच या ऐतिहासिक उड्डाणाची तयारी सुरू होती. आज दुपारी २.३५ वाजता चंद्रयान ३ ने अवकाशात यशस्वी झेप घेतली आणि एकच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. इस्रोच्या अधिकाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला. तर, श्रीहरी कोटा येथील कार्यालयात आनंदी-आनंद पाहायला मिळाला. पुढील ४२ दिवस चंद्रयान ३ मोहिमेवर शास्त्रज्ञांचे लक्ष असणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांनीही ट्विट करुन यशस्वी उड्डाणाबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतुक केलंय. आपल्या जिद्दीला आणि बुद्धीमत्तेला माझा सलाम, असे म्हणत पतंप्रधानांनी ट्विट करुन इस्रोचं अभिनंदन करत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही ट्विट करुन यशस्वी चंद्रयान ३ मोहिमेबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. तसेच, इस्रोच्या टीमने या मोहिमेसाठी महत्त्वाचं योगदान दिलं असून अथक परिश्रम घेतलं आहे. अवकाशातील संशोधनाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आपण पूर्ण केला आहे. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी देशाची असलेली कटिबद्धता या मोहिमेतून दिसून येते, असे म्हणत राष्ट्रपती मुर्मू यांनी चंद्रयान ३ मोहिमेसाठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्याआहेत.
मोदींनी काय केले ट्विट
चांद्रयान-3 भारताच्या अंतराळातील प्रवासाचा एक नवीन अध्याय आज लिहिला गेला आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत, चंद्रयान ३ ने उंच भरारी घेतली. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणामुळेच शक्य झाली आहे. त्यांच्या जिद्द आणि चातुर्याला माझा सलाम!, असे ट्विट मोदींनी केले आहे. दरम्यान, चंद्रयान ३ च्या उड्डाणापूर्वीही, भारताच्या या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. तसेच हा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल, असे मोदींनी म्हटले होते.
मुख्यमंत्र्यांकडूनही अभिनंदन
#Chandrayaan3 मोहीम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले. तसेच, चांद्रयान ही मोहिम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात देखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान मोहिम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे. या मोहिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.