मेरठ: पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी रशीदला ठार करण्यात आज लष्कर आणि पोलिसांना यश आलं. मात्र या कारवाईत एक मेजर आणि चार जवानांना वीरमरण आलं. यामध्ये मेरठचे जवान अजय कुमार यांचाही समावेश आहे. अजय यांच्या हौतात्म्याची माहिती समजताच त्यांच्या गावातील अनेकांना अश्रू अनावर झाले. अजय कुमार यांचं संपूर्ण कुटुंब शोकसागरात आहे. मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतो, अशी भावना अजय यांच्या वडिलांनी बोलून दाखवली. मुलानं 40 जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेतला, असंदेखील त्यांचे वडील म्हणाले. अजय यांची पत्नी गर्भवती आहे. पतीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यापासून त्यांचे अश्रू थांबलेले नाहीत. 26 वर्षांचे अजय कुमार मेरठच्या जानी भागातील बसा टिकरी गावचे रहिवासी होते. 7 एप्रिल 2011 रोजी ते सैन्यात दाखल झाले. यानंतर 55 राष्ट्रीय रायफल्स रॅपिड अॅक्शन फोर्समध्ये त्यांची निवड झाली. काही महिन्यांपूर्वीच त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होण्याचे आदेश मिळाले. चार वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक अडीच वर्षांचा मुलगा आहे. तर त्यांची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती आहे. अजय महिन्याभराच्या सुट्टीनंतर 30 जानेवारीला ड्युटीवर परत गेल्याची माहिती त्यांचे बालमित्र नीरज यांनी दिली. रविवारीच त्यांची पत्नीसोबत फोनवरुन बातचीत झाली होती. पाच महिन्यांपूर्वीच अजय यांच्या मोठ्या भावाचं निधन झालं आहे. त्यामुळे अवघ्या 5 महिन्यांमध्येय कुमार कुटुंबीयांवर दुसरा आघात झाला आहे. अजय यांचे वडील वीरपाल यांनीही सैन्यात सेवा दिली आहे. मुलाच्या मृत्यूची माहिती समजताच वीरपाल यांना धक्का बसला. त्यावेळी नातू आरव त्यांच्या मांडीवर बसला होता. घरात जमणाऱ्या गर्दीकडे तो कुतूहलानं पाहत होता. पुलवामात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना गुप्तचर विभागाकडून मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलासह पोलिसांनी काही घरांना घेराव घेतला. पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार रशीद गाजी याच ठिकाणी लपून बसला होता. यानंतर पोलीस, सुरक्षा दलाचे आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण घर स्फोटकांनी उडवून दिलं. त्यामद्ये गाजी ठार झाला. मात्र या कारवाईत एक मेजर आणि चार जवान शहीद झाले.
Pulwama Attack: बदला घेणाऱ्या मुलाचा अभिमान; शहीद जवानाच्या पित्याची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 5:46 PM