ऑनलाइन लोकमत,
नवी दिल्ली, दि. १४ - काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी आरएसएस आणि आयएसची तुलना केली असल्याचा आरोप फेटाळला आहे. राज्यसभेत स्पष्टीकरण देताना गुलाम नबी आझाद यांनी आपल्या कार्यक्रमाची सीडीदेखील सोबत आणली होती. 'मी भाजपा खासदारांनी विनंती करतो की त्यांनी रुममध्ये जाऊन या सीडीतील माझं वक्तव्य ऐकावं, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी आपल्या भाषणाची प्रतदेखील वाचून दाखवली.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. 'आम्ही आरएसएसचा जसा विरोध करतो, तसाच इसिसचा सुद्धा विरोध करतो. इस्लाममधील काही जण चुकीची कृत्ये करत असतील तर ते, आरएसएसपेक्षा कमी नाही', असं वक्तव्य गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केलं होतं.
भाजपा नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी गुलाम नबी आझाद यांना या वक्तव्याप्रकरणी पक्ष कायदेशीर कारवाई करेल असा इशारा दिला आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीदेखील गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. 'एका संघटनेची दुस-या संघटनेशी तुलना करणे म्हणजे तुम्ही त्यांचा प्रतिष्टितपणा त्यांना देत आहात, आणि तुम्ही अनावधानाने हेच केलं आहे', असं अरुण जेटली बोलले आहेत.