मुंबई - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये बुधवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सैन्याचे तीन मोठ्या रँकचे अधिकारी शहीद झाले. एक कर्नल, एक मेजर आणि एक डीएसपी होते. कोकेरनाग भागात जवानांवर हल्ला करणारे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यांना चारही बाजुंनी घेरले गेले होते. अचानक समोरून हल्ला झाला आणि यात राष्ट्रीय रायफल्सचे युनिट कमांडिंग ऑफिसर (कर्नल) मनप्रीत सिंग, कंपनी कमांडर (मेजर) आशिष ढोचक आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट यांना प्राण गमवावा लागला. भारतमातेच्या या तिन्ही जवानांवर शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार येत असून शहिदांच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांचे अश्रू पाहून सर्वांचेच डोळे पाणावले.
सीमारेषेवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला असून शहीद सैन्य अधिकाऱ्यांचा अभिमान वाटत आहे. मात्र, या हल्ल्यात शहीद झालेले राष्ट्रीय रायफल्सचे कंपनी कमांडर (मेजर) आशिष ढोचक हे पुढील महिन्यात सुट्टीवर घरी येणार होते. मात्र, बुधवारच्या रात्री त्यांच्या शहीद होण्याचे वृत्त झळकले. आज त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यासाठी त्यांचे पार्थिव मूळ गावी आणले जात आहे. यावेळी, त्यांच्या मातोश्रींचे शब्द ऐकून अनेकांचे डोळे पाणावले, तर काहींना भगतसिंग व त्यांच्या मातोश्रींची आठवण झाली.
मी एका वाघाला जन्म दिला होता, माझा मुलगा देशासाठी शहीद झालाय. मी रडणार नाही, तर माझ्या लेकाला सॅल्यूट करणार आहे, मुलाचं स्वागत करुन त्याला माझ्या पदरात घेणार आहे, शहीद मेजर आशिष यांच्या मातोश्री कमला देवी यांचे हे शब्द अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणणारे ठरले. सेक्टर ७ परिसरातील वीरमातेचं हे शब्द उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणत होते, यावेळी, अनेकांनी कलमा देवी यांचे सांत्वन करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तर, पतीच्या निधनानंतर रडणारी पत्नी ज्योती यांच्याकडे पाहून मन हेलावून जात होते. तीन बहिणींमध्ये एक भाऊ असलेल्या मेजर आशिष यांच्या बहिणींचा आक्रोश उपस्थितांना स्तब्ध करणार होता.
पानीपतच्या बिझौल गावचे मेजर आशिष धोनचकचे वडिल लालचंद हे पानीपत येथील सेक्टर ७ मध्ये भाड्याच्या खोलीत राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी टीडीआयमध्ये फ्लॉट घेऊन नवीन घराच्या बांधकामाचं काम हाती घेतलं होतं. पुढील महिन्यात २३ ऑक्टोबर रोजी मेजर आशिष यांच्या वाढदिनी नवीन घरात गृहप्रवेश होणार होता. त्यासाठी, सुट्टी घेऊन ते घरी येणार होते. मेजर आशिष हे तीन बहिणींचे एकुलते एक भाऊ होते. त्यांना २ वर्षाची मुलगीही आहे. यापूर्वी मार्च महिन्यात मेव्हण्याच्या लग्नासाठी ते आले होते, तेव्हाच आपल्या घरीही भेट दिली होती. मात्र, बुधवारी दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत त्यांना वीरमरण आलं.
आशिष यांचा शौर्यपदकाने झाला होता सन्मान
दरम्यान, अनंतनाग येथे जवानांची टीम उंच जागेवर चढताच आधीच लपून बसलेल्या 2-3 दहशतवाद्यांनी समोरून गोळीबार सुरू केला. यात कर्नलचा जागीच मृत्यू झाला. इतर दोन अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्या. त्यांना विमानाने श्रीनगर येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतू त्यांचे प्राण वाचले नाहीत. हे दहशतवादी लष्कर ए तौयबाच्या प्रॉक्सी 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) शी संबंधित होते. कर्नल मनप्रीत सिंग या संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व करत होते. सिंग यांना 2021 मध्ये शौर्यसाठी सेना पदक प्रदान करण्यात आले. तर मेजर आशिष ढोंचक यांना काही आठवड्यांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी शौर्यपदक प्रदान करण्यात आले होते. पोलीस अधिकारी हुमायून भट यांचे वडील जम्मू-काश्मीर पोलीस मधील आयजी पदावरून निवृत्त झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात कोकरमागचा अतिरेकी उझैर खान याचे नाव समोर आले आहे. हा संपूर्ण हल्ला त्याने दोन दहशतवाद्यांच्या साथीने केला आहे.