चंदिगड - काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीने पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रभारी यांच्यावर केलेल्या आरोपाच्या समर्थनार्थ पती नवज्योत सिंग सिद्धूही सरसावले आहेत. माझी बायको कधी खोटं बोलत नाही. ती नैतिकतेने मजबूत आहे असं प्रत्युत्तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिलं आहे. पंजाबचे पर्यटनमंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना पत्रकारांनी काही दिवसांपूर्वी नवजोत कौर सिद्धू यांनी केलेल्या आरोपावर प्रश्न विचारला होता त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेसच्या नेत्या आशा कुमारी यांच्यावर अमृतसरमधून तिकीट न दिल्याबद्दल आरोप केला होता. मात्र मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांना आरोप फेटाळून लावला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, नवजोत कौर सिद्धू यांना अमृतसर किंवा भटिंडा या लोकसभा जागेवरुन लढण्याचा आग्रह केला होता. पण त्यांना त्यास नकार दिला. तसेच नवजोत कौर सिद्धू यांना तिकीट न देण्याबाबत माझी कोणतीही भूमिका नाही कारण तिकीट वाटपाचं काम काँग्रेस हायकमांड करते.
नवजोत कौर सिद्धू यांचा आरोप होता की, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पंजाब काँग्रेस प्रभारी आशा कुमारी यांच्यामुळे मला लोकसभा तिकीट नाकारलं गेले. मी अमृतसर आणि चंदिगड लोकसभा जागेसाठी मागणी केली होती. पण माझ्या मागणीला पक्षाने दुर्लक्ष केले. आमचे मुख्यमंत्री आणि आशा कुमारी यांनी अमृतसरमधून मी निवडून येऊ शकत नाही असं सांगितल्यानंतरच माझं तिकीट नाकारलं गेलं. पण मी जर पक्षाचे काम करत असेन, तर माझ्यावर पक्षाने विश्वास ठेवणं गरजेचे होते. कारण देशाला मोदींपासून वाचवण्याची ही खरी वेळ आहे असा आरोप त्यांनी केला होता.
चंदिगड लोकसभा मतदार संघातून नवजोत कौर यांच्यासह पवन बन्सल आणि मनीष तिवारी यांची नावे उमेदवार म्हणून चर्चेत होती. अखेर, चंदिगड मतदारसंघासाठी काँग्रेसकडून पवन बन्सल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. अनेक महिन्यांपासून नवजोत कौर या चंदिगड मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेत होत्या. चंदिगड मतदार संघातून आपल्या काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या विधानावर पार्टी नाराज असून त्यामुळेच नवजोत कौर यांना उमेदवारी देण्यात आली नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. तेव्हापासून नवजोत कौर या पक्षावर नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि आशा कुमारी यांच्यावर हा आरोप केल्याचं बोललं जातंय.