बंगळुरू : कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस आघाडीच्या सरकारमध्ये कोणतीही गोष्ट सुरळीत सुरू आहे, असे दिसत नाहीय. दोन्ही पार्टीतील नेत्यांकडून चालता-बोलता अशी काही विधानं केली जात आहे, की ज्यावरुन येथील आघाडी सरकारमध्ये केव्हाही बिघाडी निर्माण होऊ शकते, असे संकेत मिळताहेत. नुकतेच कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही मुख्यमंत्रिपदाबाबत एक मोठे विधान केले आहे. '3 सप्टेंबरला कोणीतरी नवीन व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं मला समजलंय. मी किती कालावधीपर्यंत मुख्यमंत्री म्हणून राहणार हे महत्त्वाचं नाही. तर चांगलं कार्य करणं माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि हीच गोष्ट माझं भविष्य सुरक्षित करेल', असं कुमारस्वामी म्हणालेत. आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे,असा आरोपही यावेळी कुमारस्वामी यांनी केला. पण दुसरीकडे सरकार पडणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.
दरम्यान, 'मला जर जनतेचा आशीर्वाद मिळाला तर मी पुन्हा एकदा कर्नाटकचा मुख्यमंत्री होईल', असे विधान माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले होते. त्यांच्या विधानानंतर कुमारस्वामी यांनी आपली प्रतिक्रिया दिल्याचं समजतंय.
(वाचा : मी पुन्हा मुख्यमंत्री होणार- सिद्धरामय्यांना विश्वास)
- काय म्हणाले सिद्धरामय्या?राजकारणात जय-पराजय होत असतोच. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने मी परत एकदा मुख्यमंत्री होणार. मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून विरोधी पक्षांनी एकत्र प्रयत्न केले. राजकारणामध्ये जाती आणि धनशक्तीचे प्राबल्य वाढत आहे, असे विधान हसनमध्ये एका सभेत बोलताना सिद्धरामय्या केले. सिद्धरामय्या पुढे म्हणाले, 'लोक मला आशीर्वाद देतील आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने माझा पराभव झाला. पण हा शेवट नाही. राजकारणात जय-पराजय या सामान्य बाबी आहेत.'