म्यानमारहून बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे भारतात पळून आलेल्या सैनिकांना परत नेण्यासाठी आलेल्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. मिझोरमच्या लेंगपुई विमानतळावर हे विमान क्रॅश झाले. रनवेवरून घसरून हे विमान खड्ड्यात कोसळले आहे.
या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून १२ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. म्यानमारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गृहयुद्ध सुरु आहे. बंडखोर भारतीय सीमेनजीकचा प्रदेश एकामागोमाग एक असा ताब्यात घेत आहेत. त्यांच्या हल्ल्यांपासून बचावून म्यानमारचे सैनिक पलायन करून भारतात येत आहेत. त्यांच्यावर भारतीय सैन्याकडून उपचार केले जात आहेत.
या सैनिकांना परत नेण्यासाठी म्यानमारने विमान पाठविले होते. ते दुर्घटनाग्रस्त झाले आहे. जवळपास १०० सैनिक मिझोरमच्या ल्वांग्तलाई जिल्ह्यात आले होते. अरकान आर्मी (एए) बंडखोरांनी त्यांच्या छावण्यांवर हल्ले करून त्या ताब्यात घेतल्या होत्या.