लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: म्यानमारमधील सशस्त्र जातीय गट आणि सरकारी सैन्य यांच्यातील लढाईमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर म्यानमारचे ४१६ सैनिक भारतात आले असून घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी गुरुवारी सांगितले. लष्कर दिनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत जनरल पांडे यांनी भारत-म्यानमार सीमेजवळील परिस्थिती चिंताजनक असल्याचे वर्णन केले आणि काही बंडखोर गटांना त्या देशाच्या सीमावर्ती भागात दबाव जाणवत आहे आणि ते मणिपूरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती दिली.
भारत-म्यानमार सीमेवरील परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. म्यानमारच्या सर्व ४१६ लष्करी कर्मचाऱ्यांना आधीच मायदेशी पाठवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
चीन-भूतान विवादही रडारवर
- भूतान आणि चीन यांच्यातील सीमा विवाद सोडविण्यासाठी चर्चेबाबत विचारले असता, जनरल पांडे म्हणाले की, भारताच्या सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवले जातेय.
- आमचे भूतानसोबत मजबूत लष्करी सहकार्य आहे. भारत-म्यानमार सीमेवरील परिस्थिती चिंतेची बाब आहे. आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही त्यांनी सांगितले.
पूर्व लडाखमध्ये स्थिती संवेदनशील, मात्र...
- पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर; परंतु, संवेदनशील आहे आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारतीय सैन्याने उच्च सज्जता ठेवली आहे.
- जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न झाले असले तरी नियंत्रण रेषेवर पाकसोबत युद्धविराम सामंजस्य कायम आहे.
- आम्ही नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडत आहोत.
- जम्मू-काश्मीरमध्ये एकूणच हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्येही...
जम्मू-काश्मीरच्या राजौरी-पूंछ भागातील स्थिती ही चिंतेची बाब आहे. तेथील दहशतवादी कारवाया रोखण्याकरिता तैनात सैनिकांची संख्या वाढविणे, गुप्तचर यंत्रणा अधिक सक्रिय करणे, स्थानिक लोकांशी संपर्क वाढविणे ही कामे हाती घेण्यात आली असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले.
भारत दुबळा नाही, कोणीही डोळे वटारून पाहू नये : संरक्षणमंत्री
गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर चीनचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. भारत आता दुबळा देश नाही, त्याच्याकडे आता कोणीही डोळे वटारून पाहू शकत नाही हे चीनच्या लक्षात आले, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांच्या ब्रिटन दौऱ्याचा बुधवारी समारोप झाला. एका भाषणात ते म्हणाले की, आर्थिक व परराष्ट्र धोरणामध्ये बदल केल्यामुळेच भारत आता जगातील एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो हे सत्य चीनने आता स्वीकारले आहे.