आसाममधील प्रसिद्ध काझीरंगा नॅशनल पार्कला दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. दरम्यान, येथील एक थरारक व्हिडीयो समोर आला आहे. काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये जीप सफारीदरम्यान, एक आई आणि मुलगी जीपमधून खाली पडली. त्याचवेळी त्यांच्यासमोर दोन गेंडे येऊन उभे राहिल्याने दोघींचाही जीव धोक्यात आला. मात्र प्रसंगावधान राखत दोघींनी आपले प्राण वाचवले. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
काझीरंगा नॅशनल पार्कमधील बगोरी वनक्षेत्रात जीप सफारीदरम्यान, या मायलेकीचे प्राण सुदैवाने वाचले. पर्यटक जीपमधून जंगल सफारीचा आनंद घेत असताना ही घटना घडली. जंगलातून ही जीप वेगाने जात असताना अचानक मुलगी खाली पडली. मुलीला पडताना पाहून आईनेही जीपमधून खाली उडी मारली.
जिथे ही घटना घडली तिथे समोरच दोन गेंडे होते. तसेच ते पर्यटकांच्या वाहनाच्या दिशेने चाल करून येत होते. खाली पडलेल्या मायलेकींना पाहून इतर पर्यटकांच्या काळजाचाही ठोका चुकला. मात्र दोघींनीही प्रसंगावधान राखत गेंड्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि पुन्हा जीपमध्ये चढल्या.
या थरारक घटनेचा व्हिडीओ इतर पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला. आता हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान, काझीरंगा नॅशनल पार्क प्रशासनाकडून पर्यटकांना सफारीदरम्यान, सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.