नवी दिल्ली : दिल्लीच्या बुरारी भागातील संतनगरमधील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या सामूहिक आत्महत्येने एकच खळबळ उडाली असताना या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. या प्रकरणाला नवं वळण देणारी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मृत भाटिया कुटुंबातील 11 जण मृत्यूआधी दररोज 6 दिवस आत्महत्येची प्रॅक्टिस करत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
नारायणी भाटिया यांचा लहान मुलगा ललित कोणाच्या तरी आदेशानुसार डायरी लिहीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. ललितने 30 जून रोजी डायरीत लिहिलेल्या मजकुरानुसार घरातील सदस्य हे 24 जूनपासून गळफास घेऊन आत्महत्या करण्याची प्रॅक्टिस करत होते. मात्र त्या प्रॅक्टिसदरम्यान त्यांचे हात, पाय, तोंड बांधलेले नसल्यामुळे ते वाचत असत. तसेच आत्महत्येआधी पूर्ण कुटुंबीय होम हवन करत असल्याचंही उघड झालं होतं. ललितने डायरीत लिहिलेल्या सूचनांचं कुटुंबातील सर्व सदस्य काटेकोरपणे पालन करत होते. वडील गोपाळदास यांच्या सूचनेवरून ललित डायरी लिहायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र यातील धक्कादायक बाब म्हणजे ललितच्या वडिलांचा 10 वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता.
डायरीच्या पानांवर ललितचे वडील सगळ्यांना वाचवण्यासाठी येणार असल्याचंही लिहिलं होतं. डायरीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील मजकूर पोलिसांना सापडला आहे. तसेच मृत्यू हा मोक्षप्राप्तीचा मार्ग असल्याच्या आशयाचा मजकूरही पोलिसांना डायरीत आढळून आला आहे. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी या कुटुंबानं आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.