चेन्नई : चेन्नई सेंट्रल उपनगरी रेल्वे स्थानकातून एका लोकल गाडीचे अपहरण कोणी केले आणि ते करण्यामागचा त्याचा नेमका हेतू काय होता, याचे गूढ उकलण्यात पोलिसांना गेली सात वर्षे तपास करूनही यश आलेले नाही.दि. २९ एप्रिल २००९ रोजी, रविवारी, पहाटे ५ वाजता एका इसमाने फलाटावर उभ्या असलेल्या चेन्नई-तिरुवेल्लूर लोकल गाडीचे अपहरण केले होते. अर्थात लोकल कशी चालवायची किंवा कशी थांबवायची याची अपहरण करणाऱ्यास काहीच ज्ञान नसल्याने सुसाट वेगाने चेन्नई सेंट्रल स्थानकातून बाहेर पडलेली ही लोकल थोडेच अंतर गेल्यावर व्यासारपजी जिवा या पुढच्या स्टेशनवर उभ्या असलेल्या मालगाडीवर जाऊन आदळली होती. दोन गाड्यांची ही टक्कर जे़थे झाली तेथे वर रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठीचा लोखंडी पादचारी पूल होता. टक्करीचा आघात एवढा प्रचंड होता की लोकल गाडीचे डबे सरळ उभे झाले व पुलावर आदळले. सुदैवाने रविवारची पहाट असल्याने लोकलमध्ये फक्त ११ प्रवासी होते. स्वत: अपहरणकर्त्याखेरीज लोकलमधील तीन प्रवासी या विचित्र घटनेत ठार झाले होते.दोन रेल्वेगाड्यांची जेथे टक्कर झाली तेथे रेल्वेरुळावर पडलेले एका पुरुषाचे प्रेत पोलिसांना मिळाले. त्या प्रेताचे हात तुटलेले होते व त्या तुटलेल्या हातांपैकी एका हातावर तेलगू भाषेत ‘नागराजू’ असे नाव गोंदवलेले होते.हे प्रेत ज्याने लोकल पळविली त्याचेच असावे, असा पोलिसांचा कयास आहे. याचे कारण पोलीस असे देतात की, गाडीची टक्कर होणार आहे हे फक्त त्यालाच कळले होते व ते पाहून त्याने धावत्या लोकममधून उडी मारली होती. लोकलच्या डब्यांमधीये बसलेल्या तुरळक प्रवाशांपैकी एकही गाडीतून बाहेर फेकला गेला नव्हता व ते बसल्या जागीच जखमी अथवा मृत झाले होते. मृत पावलेल्या तीन प्रवाशांची ओळख पटली होती. त्यामुळे ओळख न पटलेला मृतदेह अपहरणकर्त्याचाच असण्याची प्रबळ शक्यता दिसते.रेल्वे अधिकाऱ्यांनी आदळलेल्या लोकलच्या स्पीडोमीटरचे जे रेकॉर्ड उपलब्ध केले त्यावर टक्कर झाली तेव्हा लोकलचा वेग ताशी ९० किमी होता. तपासकर्त्यांनी एक लोकल गाडी त्याच मार्गाव, त्याच वेगाने धाववली व तिला अचानक ब्रेक लावला तेव्हा लोकल ५० मीटर पुढे गेल्यावर तिला ब्रेक लागला होता. यावरून ज्याने लोकल पळविली त्याने टक्कर होतेय हे दिसल्यावर ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असे गृहित धरले तरी त्याला ती टक्कर टाळणे शक्य झाला नाही व म्हणूनच त्याने बाहेर उडी मारली व त्याने त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांना वाटते.लोकल गाडीला पुढे, मागे व मध्ये अशी तीन इंजिने असतात. ज्याने लोकल पळविली त्याने यापैकी कोणते इंजिन सुरु केले होते, हेही स्पष्ट झाले नाही. बुचकळ््यात टाकणारी आणखी एक बाब म्हणजे, पळविलेली ही लोकल ताशी ९० किमी एवढ्या सुसाट वेगाने धावूनही तिने त्यासाठी वापरलेल्या विजेची कुठेही नोंद झालेली नाही. (वृत्तसंस्था)नागराजू होता तरी कोण?तुटलेल्या हातावर तेलगुमध्ये गोंदलेले ‘नागराजू’ हे नाव आणि त्या प्रेताचा फोटो याआधारे केलेला तपास निष्फळ ठरला आहे.ंते नाव आणि फोटो याआधारे आंध्रच्या नऊ व ओडिशाच्या एका जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्ती व मतदारयाद्या तपासल्या पण नाव आणि फोटोतील व्यक्ती यांचे वर्णन जुळले नाही.अपघातस्थळी जे काही हाताचे ठसे मिळाले त्यापैकी एकही या तुटलेल्या हाताशी जुळत नाही.रुळांवर सापडलेले प्रेत आपल्या व्यक्तीचे आहे, असे सांगत चार कुटुंबे पुढे आली. एका महिलेने तर तो पती असल्याचा दावा केला. पण डीएनएनंतर तथ्य आढळले नाही.
चेन्नई लोकल अपहरणाचे गूढ सात वर्षांनंतरही कायम
By admin | Published: October 26, 2016 1:09 AM