ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - बॉलीवुडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या मृत्यूच्या पाच दिवसानंतरही त्यांच्या मृत्यूबाबत गूढ वाढतच आहे. त्यांचा फोन शोधण्यात पोलिसांना अपयश आलं होतं. मात्र, पुरी यांचा मोबाईल त्यांची दुसरी पत्नी नंदीता पुरी यांच्याकडे मिळाला असल्याचं वृत्त आहे. त्यांचा मोबाईल या प्रकरणातील महत्वाचा भाग आहे.
सुरूवातीच्या चौकशीमध्ये पोलिसांना पुरी यांच्या मोबाईलचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र, पोलिसांनी मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं असता त्याचं शेवटचं लोकेशन वर्सोवामध्ये मिळालं. वर्सोवामध्ये नंदीता पुरी राहतात. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत मोबाईल आपल्याकडे असल्याचं नंदीता यांनी मान्य केलं.
पोलिसांनी फोन मागितला असता नंदीता यांनी फोन देण्यास नकार दिला आणि फोन पोलिस स्थानकातच जमा करेल असं सांगितलं. फोन पोलिसांना देण्याआधी फोन फॉर्मेट केल्याचं समोर येत आहे.
सहा जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर समोर आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये पुरी यांच्या डोक्यामध्ये इजा झाल्याचे निशाण तसेच मानेजवळील हाड आणि हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचं अहवालात म्हटलं आहे.