ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा" असा नारा देत भारतीय स्वतंत्र लढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ अखेर उलघडले आहे. 1945 रोजी झालेल्या तैवानमधील विमान अपघातात जखमी झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमच भारतीय सरकारने स्पष्ट केले आहे. सायक सेन या व्यक्तीने याबाबत एक आरटीआय अंतर्गत याबाबतची माहिती मागितली होती. आरटीआयमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना गृह मंत्रालयाकडून असे स्पष्ट करण्यात आले की, शहनवाज कमेटी, जस्टिस जीडी खोसला कमिशन आणि जस्टिस मुखर्जी कमिशन यांच्या रिपोर्टनुसार नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात झाला होता. मुखर्जी कमिशन यांच्या रिपोर्टमध्ये पान क्रमांक 112 ते 122 याबाबत माहिती आहे. तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 37 गोपनीय फायली सरकारने याआधीच सार्वजनिक केल्या आहेत.
गृह मंत्रालयाच्या या स्पष्टीकरणावर सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेताजीचे पंतू आणि पश्चिम बंगालचे भाजपा नेते चंद्र कुमार बोस यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गृह मंत्रालयाने याबाबत माफी मागावी असे म्हटले आहे. विमान अपघातात जखमी झाल्याने नेताजींचा मृत्यू झाल्याचे ब्रिटनमधील बोसफाईल्स डॉट इन्फो या संकेतस्थळावर 17 जानेवारी 2016 रोजी स्पष्ट केले होते. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, नेताजींचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात तैपेई येथे झाला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बरोबर त्यावेळी असलेल्या पाच जणांची साक्ष उपलब्ध असून त्यात नेताजींचा निकटचा सहकारी. जपानचे दोन डॉक्टर, एक दुभाष्या व तैवानी परिचारिका यांचा समावेश आहे.