नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत एन. डी. तिवारींच्या मुलाच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या गुन्हे शाखेने त्यांच्या सुनेला अटक केली आहे. लग्नापासून खूश नसल्याने खून केल्याची कबुली तिने दिली आहे.
अपूर्वा शुक्ला असे तिचे नाव असून चौकशीमध्ये तिने रोहित शेखरची गेल्या सोमवारी हत्या केल्याचे म्हटले आहे. तपासामध्ये संशयाची सुई अपूर्वाकडे वळत होती. यामुळे पोलिसांनी तिची तीन दिवस चौकशी केली. मात्र, तिने पोलिसांना मोबाईल फोन फॉरमॅट करून दिल्याने संशयाच्या फेऱ्यात आली. या चौकशीमध्ये तिने सोमवारी रात्री 11 वाजता रोहितसोबत भांडण झाले होते. यावेळी दोघांनी एकमेकांचा गळा दाबला. यावेळी जोरात गळा दाबला गेल्याने झोपल्यानंतर रोहितचा मृत्यू झाला असेल असे समोर आले आहे. मात्र, गुन्हे शाखेला अपूर्वाच्या या कबुलीवर विश्वास नसल्याने त्यांनी चौकशी सुरु ठेवली असून तिला अटक केली आहे.
आज अपूर्वाने ती रोहितशी लग्न केल्यापासून खूश नव्हती. रोहित दारुच्या नशेत असताना त्याचा एकटीनेच गळा आवळून खून केला. न्यायालयामध्ये लवकरच हजर होईन अशी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपूर्वा ही सर्वोच्च न्यायालयाची अधिवक्ता आहे. यामुळे तिने जाणूनबुजून हत्येच्या कलमांपासून स्वताचा बचाव करण्यासाठी हा बनाव रचला असण्याचा संशय पोलिसांना आहे. तिच्या मोबाईल रेकॉर्डमध्ये तिने मंगळवारी सकाळी 11 वाजता दिल्लीबाहेर राहणाऱ्या एका व्यक्तीला फोन केला होता. त्याच्याशी यासंदर्भात सल्लामसलत केल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे. 15 एप्रिलला रोहित तिवारीचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत घरात सापडला होता. शवविच्छेदनामध्ये रोहित यांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे उघड झाले होते.
त्यादिवशी नेमके काय झाले?रोहित हे मतदान करून सोमवारी सकाळी ११.३० वा. घरी परतले. मंगळवारी सायंकाळी ४.४१ वा. त्यांचा मृतदेह घरात सापडला. त्यांनी आत्महत्या केली असावी, असे सुरुवातीला वाटले होते. मॅक्स हॉस्पिटलला त्यांच्या घरून फोन आला तेव्हा त्यांच्या आई उज्ज्वला तिवारी स्वत:वर उपचार करून घेण्यासाठी रुग्णालयातच होत्या. उज्ज्वला यांना घरून फोन आला की, रोहित यांच्या नाकातून रक्त येत आहे. त्या अॅम्ब्युलन्स घेऊन घरी गेल्या. रोहित यांना ५ वा. रुग्णालयात आणले तेव्हा ते मृतावस्थेतच होते.
रोहितच्या आईने अपूर्वावरच संशय व्यक्त केला होता. दिल्लीतील डिफेन्स कॉलनीतील घराची किंमत करोडोंमध्ये असल्याने ही मालमत्ता हडपण्यासाठी तिने रोहितचा खून केल्याचे म्हटले होते. तर हत्येपूर्वी अपूर्वा न्यायालयीन कामकाजासाठी महिनाभर बाहेर होती. घरातील सीसीटीव्ही मध्ये रात्री 1.30 वाजता अपूर्वा रोहितच्या खोलीत जाताना आणि 2.30 वाजता बाहेर येताना दिसली आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये याच दरम्यान रोहितचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
जूनमध्ये घटस्फोट घेणार होतेरोहितची आई उज्ज्वला यांनी आरोप लावला आहे की अपूर्वा आणि तिच्या माहेरचे संपत्ती हडप करणार होते. त्यांची ओळख एका मॅट्रीमोनी साईटवर झाली होती. लग्नानंतर लगेचच अपूर्वा रोहितवर संशय घेऊ लागली. तसेच अपूर्वाच्या घरच्यांना एन डी तिवारींकडे अफाट संपत्ती असल्याची भावना होती. यामुळे तिने आईला मध्यप्रदेशमध्ये कुठेतरी घर बांधून दे असे सांगितले होते. मात्र, रोहितने यास नकार दिला होता. यानंतर रोहितने आणि अपूर्वाने परस्पर सामंजस्याने जूनमध्ये घटस्फोट घेण्याचे ठरविले होते. अपूर्वाचा लग्नाआधी प्रियकरही होता. लग्नालाही वर्ष झालेले नाही, असे आरोप केले आहेत.