श्रीनगर/जम्मू : जम्मू-काश्मिरातील नॅशनल कॉन्फरन्स आणि काँगे्रस आघाडी रविवारी संपुष्टात आली. दोन्ही पक्षांनी राज्यात यावर्षी होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी व सैफुद्दीन सोज यांनी जम्मूत पत्रपरिषद घेऊन आपली भूमिका मांडली़ आपला पक्ष आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवेल आणि निवडणूकपूर्व कुठलीही आघाडी करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले़ अखिल भारतीय काँगे्रस कमिटीच्या सरचिटणीस, तसेच जम्मू काँग्रेस प्रभारी अंबिका सोनी यावेळी म्हणाल्या की, सर्व स्तरावरील कार्यकर्ते तसेच पक्षनेत्यांशी चर्चा केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे़ जम्मू-काश्मिरातील ८७ जागा आम्ही लढवू किंवा काही पारंपरिक मित्र उमेदवारांना पाठिंबा देऊ़ काँग्रेसची ही पत्रपरिषद होऊन काही मिनिटे होत नाही तोच मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावरून आपली भूमिका जाहीर केली़ राज्यात काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी शक्य नसल्याचे आमच्या पक्षाने दहा दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना कळविले होते, अशी घोषणा त्यांनी केली़ त्यांनी टिष्ट्वटरवर यासंदर्भात लिहिले की, मी दहा दिवसांपूर्वीच सोनियांना भेटलो होतो आणि नॅशनल कॉन्फरन्स स्वबळावर लढणार असल्याचे त्यांच्यासमक्ष स्पष्ट केले होते़ काँग्रेसपूर्व निवडणूक आघाडी न करण्यामागचे कारण मी काँग्रेस श्रेष्ठींसमक्ष स्पष्ट केले होते़ मात्र मी याची जाहीर वाच्यता करू इच्छित नाही; कारण मला संधिसाधू ठरवले जावे, अशी माझी इच्छा नाही़ (वृत्तसंस्था)
नॅ. कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी संपुष्टात
By admin | Published: July 21, 2014 2:12 AM