नवी दिल्ली : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. जिरिबाम जिल्ह्यातील एका नदीमध्ये सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सापडल्यानंतर काही तासांतच राज्यात हिंसाचार उफाळला आहे. शनिवारी आंदोलकांनी तीन मंत्र्यांसह सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केला. त्यानंतर राज्य सरकारने पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
ना मणिपूर एक आहे, ना मणिपूर सुरक्षित आहे, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "तुमच्या डबल इंजिन सरकारमध्ये ना मणिपूर एक आहे, ना मणिपूर सुरक्षित आहे. मे 2023 पासून राज्य अकल्पनीय वेदना, विभाजन आणि वाढत्या हिंसाचारातून जात आहे. त्यामुळे आपल्या लोकांचे भवितव्य उद्ध्वस्त झाले आहे. आम्ही हे पूर्ण जबाबदारीने म्हणत आहोत की, भाजपला त्यांच्या घृणास्पद विभाजनवादी राजकारणामुळे मुद्दाम मणिपूर जाळायचे आहे, असे दिसते."
पुढे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की,"७ नोव्हेंबरपासून आतापर्यंत १७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. संघर्षग्रस्त भागांच्या यादीत नवीन जिल्हे जोडले जात आहेत आणि आग सीमेवरील ईशान्येकडील राज्यांमध्ये पसरत आहे. मणिपूर या सुंदर सीमावर्ती राज्यात तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरला आहात. भविष्यात तुम्ही मणिपूरला गेलात तरी राज्यातील जनता कधीही माफ करणार नाही. येथील लोक कधीच विसरणार नाहीत की, तुम्ही त्यांना त्यांच्याच परिस्थितीवर सोडले आणि त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी त्यांच्या राज्यात कधीही प्रवेश केला नाही."
दरम्यान, मागच्या दीड वर्षांपासून अशांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारीपासून बेपत्ता असलेल्या दोन महिला आणि एका मुलीचा मृतदेह शनिवारी जिरिबाममधील बारक नदीमध्ये सापडला. तर अन्य तिघांचे मृतदेह हे शुक्रवारी रात्री सापडले होते. यामुळे काही तासांतच राज्यात हिंसाचार उफाळला आहे. आंदोलकांनी तीन मंत्र्यांसह सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केला. त्यानंतर राज्य सरकारने इंफाळ पूर्व आणि पश्चिम, बिष्णुपूर, थौबल आणि कचिंग जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे.