भुवनेश्वर: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र, पंजाब यांसारख्या राज्यांमध्ये स्थिती अधिक गंभीर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रानंतर कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने ओडिशातील ७०० लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. (nab kishore das claims that 700 centre close in odisha due to shortage of corona vaccine)
कोरोना लसींच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्र आणि केंद्र सरकार एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राकडून सातत्याने कोरोना लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे मागणी केली जात आहे. अशातच आता ओडिशाचे आरोग्यामंत्री नब किशोर दास यांनी केंद्राला पत्र पाठवून कोरोना लसींचा पुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे.
राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने प्रश्न निकाली काढावा; रोहित पवारांचा सल्ला
७०० कोरोना लसीकरण केंद्र बंद
कोरोना लसीच्या कमतरतेमुळे ओडिशामधील १४०० पैकी तब्बल ७०० लसीकरण केंद्र बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील अनेक ठिकाणची कोरोना लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. राज्यात केवळ दोन दिवसांपुरताच कोरोना लसींचा साठा उपलब्ध आहे. कोरोना लसींचा पुरवठा झाला नाही, तर राज्यातील कोरोना लसीकरण ठप्प होईल, अशी शक्यता दास यांनी वर्तवली आहे.
२५ लाख कोरोना लसीचे डोस पाठवा
ओडिशामध्ये दररोज किमान अडीच लाख कोरोना लसींचे डोस नागरिकांना दिले जातात. आता ओडिशामध्ये केवळ ५.३४ लाख कोरोना लसींचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे केवळ दोन दिवस पुरेल, एवढाच साठा शिल्लक राहिलेला आहे. केंद्राने तातडीने किमान २५ लाख डोस ओडिशाला पाठवून द्यावेत, अशी मागणी आरोग्यमंत्री दास यांनी केली आहे. यापूर्वीही १५ लाख डोस पाठवण्याची विनंती केली होती. मात्र, त्यावर अद्याप कोणतेही उत्तर आले नसल्याचे दास यांनी म्हटले आहे. ओडिशामध्ये दररोज २ लाख कोरोना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु, लसींच्या कमरतेमुळे बुधवारी १.१० लाख लसींचे डोस देण्यात आल्याची माहिती दास यांनी दिली.
भयंकर! जगातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट; रुग्णसंख्या १३ कोटी ३० लाख
दरम्यान, देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव का कशासाठी? राज्यात आज केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आले. पण इतर राज्यांना ४० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. यात राजकारणाचा मुद्दा नाही. पण ज्या पद्धतीने पुरवठा केला जात आहे ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख डोसेस द्या त्यापेक्षा अधिक आमची काहीच मागणी नाही, असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.