पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिच्या करण्यात आलेल्या हत्येच्या घटनेवरून निर्माण झालेला जनप्रक्षोभ दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांकडून सुरू झालेल्या नबन्ना प्रोटेस्टला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांसा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. मात्र तरीही हे आंदोलन सुरू झाले असून, त्याला हिंसक वळण लागल्याचं वृत्त आहे.
आंदोलकांना रोखण्यासाठी कोलकात्यामधील प्रसिद्ध हावडा ब्रिज सील करण्यात आला होता. तसेच इथे लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मात्र आंदोलकर्त्या विद्यार्थ्यांनी हे बॅरिकेट्स खेचून हटवले. दरम्यान, ४ विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. पाण्याचे फवारे सोडले. एवढंच नाही तर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. मात्र तरीही आंदोलक पांगले नाहीत. उलट काही आंदोलक हावडा ब्रिजवरच ठिय्या देऊन बसले. या आंदोलनकर्त्यांपैकी काहींनी सोबत तिरंगाही आणला होता.
दरम्यान, या आंदोलनाबाबत तृणमूल काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार सयानी घोष यांनी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन म्हणजे गुंडगिरी आहे, असा आरोप केला आहे. या आंदोलनामध्ये चुकून कुठली तरी एखादी महिला दिसत आहे. केवळ ४-५ तिरंगे दिसत आहेत. हे आंदोलन पिकनिकसारखं आहे. पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या पाण्याच्या फवाऱ्याखाली आंदोलन स्नान करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.