कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला असताना राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापू लागलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेली असल्याने केंद्र विरोधात राज्य सरकारमध्ये दरी वाढू लागली आहे. आजी माजी खासदारांसह 11 आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत शहांच्या उपस्थितीच भाजपात प्रवेश केला आहे. वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता नाराजांनी अधिकाऱ्यांसोबत भाजपात प्रवेश केला आहे. याच दरम्यान नागरिकांना धमकी देणारी एक सूचना समोर आली आहे.
पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यामध्ये रविवारी पहाटे एका भिंतीवर चक्क नागरिकांना धमकी देणारी एक सूचना लिहिण्यात आली आहे. भाजपाला मत देणाऱ्यांना धमकी देण्यात आली आहे. "तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिलं गेलं तर रक्ताचे पाट वाहतील. भाजपाला एकही मत दिलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील" असा धमकी देणारा मेसेज भिंतीवर लिहिण्यात आला आहे. बंगाली भाषेत हे लिहिण्यात आलं आहे. हा मेसेज नेमका कोणी लिहिला असेल यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच राजकारण तापलं आहे.
भाजपचे जगन्नाथ सरकार हे या भागात खासदार तर टीएमसीचे अरिंदम भट्टाचार्य हे आमदार आहेत. याआधी उत्तर 24 परगना जिल्ह्यातील बरेकपूरमध्ये काही जणांकडून भाजपच्या एका कार्यालयाला आग लावण्यात आली होती. त्यामुळे या भागातही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला आहे. "निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल" असं म्हणत अमित शहांनी हल्लाबोल केला आहे. तसेच जेव्हा पश्चिम बंगालमध्ये विधानसभेचे निकाल लागतील तेव्हा भाजपा 200 च्या बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच "भारतीय जनता पक्षाला पाच वर्ष द्या. आम्ही बंगालला सोन्यासारखं बनवू" असं देखील म्हटलं आहे. पश्चिम बंगालची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली आहे. जर राज्याला वाचवायचे असेल तर त्याची कडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
"ही तर सुरुवात... निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल", अमित शहांचा हल्लाबोल
"आज सर्व पक्षांतील चांगले लोक भाजपात दाखल झाले आहेत. आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरुवात झाली आहे. निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल. जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतील, तेव्हा 200 पेक्षा अधिक जागा जिंकून भाजपा सत्तेत आलेली असेल. ममता दीदी म्हणतात, भाजपा लोकांना करायला लावते. दीदींना मी आठवण करून देऊ इच्छितो की, जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूल पक्ष बनवला, ते पक्षांतर नव्हते का?" अशा शब्दांत अमित शहांनी ममता बॅनर्जींना सणसणीत टोला लगावला आहे.