कोहिमा : नागालँडच्या मुख्यमंत्रिपदासाठी सहमतीचे उमेदवार म्हणून नागालँड पीपल्स फ्रन्टचे (एनपीएफ) अध्यक्ष शुरहोझेलाई लिझित्सू यांची सोमवारी निवड करण्यात आली. ते टी. आर. झेलियांग यांची जागा घेतील. डेमोक्रॅटिक अलायन्स आॅफ नागालॅण्डच्या (डीएएन) बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून लिझित्सू यांची निवड करण्यात आली. या बैठकीला ५९ आमदार उपस्थित होते. लिझित्सूू डीएएनचेही अध्यक्ष आहेत. झेलियांग यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारून पुढील व्यवस्था होईपर्यंत राज्याचा कारभार पाहण्यास सांगितले. एनपीएफ विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या नेत्याची निवड करण्यात आली, असे झेलियांग यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नगरपालिका निवडणुकांत ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील, अशी घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर नागालँडमध्ये निदर्शनांना तोंड फुटले होते. विविध संघटना नगरपालिका निवडणुका रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यातच दिमापूर येथे पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर वातावरण चिघळले होते. परिणामी झेलियांग यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. नगरपालिका निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया रद्द करा, गोळीबारास जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करा दोन्ही मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने केली आहे. (वृत्तसंस्था)
नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी लिझित्सू
By admin | Published: February 21, 2017 1:19 AM