कोहिमा - ईशान्य भारतामधील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी(3 मार्च) जाहीर झाले. सुरुवातीचे कल पाहता त्रिपुरामध्ये भाजपाने ऐतिहासिक यश मिळवले आहे. याठिकाणी तब्बल 25 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून भाजपचे सरकार येणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मेघालयात भाजपाला तितकेसे यश मिळालेले नाही. याठिकाणी काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असल्याचे चित्र आहे.या दोन राज्यांबरोबर नागालँडमध्ये सत्ताधारी नागा पिपल्स फ्रंटने (एनपीएफ) भाजपासोबतची 15 वर्षांची युती तोडल्यामुळे तिथे काय होणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. एनपीएफमधून फुटून निघालेले माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नेपीयू रीयो यांच्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीशी (एनडीपीपी) भाजपाने युती केली होती. दुपारी 12 वाजेपर्यंतचे निकाल पाहता, नागालँडमध्येही भाजपने नव्या मित्रासोबत (एनडीपीपी) चांगले यश मिळवल्याचे चित्र आहे. नागालँड विधानसभेची सदस्य संख्या ६० असून ५९ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. मावळत्या विधानसभेत एनपीएफचे ३८ , काँग्रेस-८, राष्ट्रवादी काँग्रेस-४, भाजप-१, जेडीयू-१ अपक्ष-८ असे पक्षीय बलाबल होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीनुसार भाजपा-एनडीपीपी 32, एनपीएफ 26 आणि अपक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे तुर्तास तरी भाजप आपल्या नव्या मित्राच्या सहाय्याने नागालँडमध्ये पुन्हा सत्तेत येईल, असे चित्र दिसत आहे. नागा पिपल्स फ्रंट पक्ष या ठिकाणी 2003 पासून सत्तेत होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीचे निकाल पाहता भाजपाने राज्यात स्वत:ची पाळेमुळे रोवण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागालँडमध्ये भाजपाचं 'नवा गडी, नवं राज्य'; जुन्या मित्राला मागे टाकत मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2018 12:22 PM