नागालँड विधानसभेच्या निवडणुकीत इतिहास रचला गेला आहे. राज्यात प्रथमच विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. दिमापूर तृतीय विधानसभा मतदारसंघातून हेकानी जखालू विजयी झाल्या आहेत. हेकानी जखालू यांनी भाजप आणि एनडीपीपी युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी एलजेपी (रामविलास) च्या अजितो जिमोमी यांचा 1536 मतांनी पराभव केला.
याचबरोबर, एनडीपीपी आणि भाजप युतीच्या आणखी एक महिला उमेदवार सलहूतुनु क्रुसे या पश्चिम अंगामी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार केनेजाखो नखरो यांचा 12 मतांच्या कमी फरकाने पराभव केला. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीत केवळ चार महिला उमेदवारांना तिकीट मिळाले होते. हेकानी जखालू त्यापैकीच एक आहेत. निवडणुकीदरम्यान हेकानी जखालू यांच्या प्रचारासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हेही राज्यातील मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्यासोबत पोहोचले होते.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, 60 जागांसाठी आतापर्यंत मिळालेल्या कलांमध्ये एनडीपीपी 24 जागांवर पुढे आहे. एनडीपीपीचा युतीतील सहयोगी पक्ष भाजप 12 जागांवर पुढे आहे. एनडीपीपीने 40 तर भाजपने 20 जागांवर निवडणूक लढवली होती. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, एनडीपीपी सुप्रीमो आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी काँग्रेसचे उमेदवार एस. सचू यांचा 15,824 मतांनी पराभव झाला आहे. वोखा येथील ट्यूई जागेवर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार वाय पॅटन 8800 मतांनी आघाडीवर आहेत.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, अपक्ष उमेदवारांनी तीन जागा जिंकल्या आहेत, तर एका जागेवर अपक्ष आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागा जिंकल्या असून त्यांचे पाच उमेदवार पुढे आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) दोन तर लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) दोन जागा जिंकल्या आहेत. एलजेपीने एका जागेवर आघाडी घेतली आहे. याशिवाय, जेडीयूने एक, नागा पीपल्स फ्रंटने दोन आणि राष्ट्रवादी पीपल्स पार्टीने दोन जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी पीपल्स पार्टी सध्या तीन जागांवर आघाडीवर आहे.
27 फेब्रुवारीला झाले होते मतदान नागालँड विधानसभेच्या 59 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. अकुलुटो मतदारसंघातून भाजपचे उमेदवार काझेतो किनीमी बिनविरोध विजयी झाले आहेत.