कोहिमा : एकट्या नागालँडमध्ये पीपल लिव्हींग विथ एचआयव्ही (पीएलएचआयव्ही) आणि एड्स झालेले २२ हजार ८७८ रूग्ण आहेत. या राज्यात प्रौढांमध्ये याची लागण व्हायचा दर ०.७६ टक्के असून, तो देशात तिसरा सर्वात जास्त आहे. ही माहिती नागालँड एड्स नियंत्रण सोसायटीने दिली.ही पाहणी १९९९ ते २०१८ या काळात करण्यात आली. देशात मणिपूरमध्ये एचआयव्हीची प्रौढांमध्ये लागण व्हायचा सर्वात जास्त दर १.०६ टक्के तर मिझोरममध्ये ०.७९ टक्के होता, असे दिसले, असे एनएसएसीएसच्या उपसंचालक व्हेझोखोलू थियो यांनी सांगितले.राज्यात एचआयव्हीची लागण व्हायचा दर गेल्या काही वर्षांत खाली येत आहे ही चांगली बातमी असल्याचे त्या म्हणाल्या. संपूर्ण देशात २१.१ लाख पीएलएचआयव्हीचे रुग्ण असून आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, तमिळनाडू, पश्चिम बंगाल व राजस्थान या राज्यांत यापैकी ८२ टक्के रुग्ण आहेत.त्या राज्यात १४ वर्षांखालील मुलांमध्ये एचआयव्हीची लागण व्हायचा दर ६ टक्के असून १५ ते २४ वयोगटात हाच दर १५ टक्के आहे. नागालँडमध्ये २२,८७८ लोकांच्या चाचण्या या पॉझिटिव्ह निघाल्या. त्यातील १६७१३ रुग्णांनी अँटी रिट्रोव्हायरल थेरेपीसाठी (एआरटी) नाव नोंदणी केलेली आहे. १९९९ ते २०१८ या कालावधीत १५०४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे थियो म्हणाल्या.एनएसएसीएला केंद्र सरकार व इतर संस्थांकडून निधी मिळतो. एनएसएसीएने आठ जिल्ह्यांत एआरटी केंद्रे स्थापन केली असून सहा जिल्ह्यांत एआरटी सेंटर्सला आणि पाच जिल्ह्यांत केअर अँड सपोर्ट सेंटरला लिंक केले आहे. राहिलेल्या जिल्ह्यांना या वर्षात अशाच सुविधा मिळतील, असे थियो म्हणाल्या.
नागालँडमध्ये एचआयव्ही, एड्सचे २२,८७८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 2:18 AM