Nagaland News: देशातील पूर्वोत्तरला अनेक राज्ये आहेत, ज्यात आदिवासी समाजातील लोकांची मोठी संख्या आहे. यातील एक राज्य आहे नागालँड. हे अतिशय सुंदर राज्य असून, यात विविध संस्कृतीचे लोक राहतात. पण, या राज्याशी संबंधित काही विचित्र गोष्टींची देशभर चर्चा असते. अनेकजण मानतात की, नागालँडचे लोक कोंबडी, बकरा आणि माशांसह कुत्रे, मांजर, माकडे, साप, खारुताई, कोळी आणि मुंग्यादेखील खातात. अशीही अफवा आहे की, इथले लोक माणसंही खातात. आता या सर्व गोष्टींवर नागालँडमधील भाजपच्या मंत्र्याने स्पष्टीकरण दिले आहे.
भाजप नेते तेमजेन इमना (temjen imna along) नागालँडचे उच्च शिक्षण आणि आदिवासी व्यवहार मंत्री आहेत. ते सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाद्वारेच ते देशभर लोकप्रिय झाले आहेत. त्यांनी टीव्ही9 भारतवर्ष चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नागालँडबाबत असलेल्या काही अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे. टेमजेन इमवा यांनी त्यांचा एक किस्सा शेअर केला आणि सांगितले की, ते 1999 मध्ये पहिल्यांदा दिल्लीत आले होते, तेव्हा लोक त्यांना विचारायचे की तुम्ही काय खाता? त्यावर ते उत्तर द्यायचे की, नागालँडचे लोक इतर सर्व लोकांप्रमाणे सामान्य अन्न खातात.
अनेक लोक त्यांना विचारायचे की, नागालँडचे लोक माणसं खातात, असं ऐकलंय. हे खरं आहे का? यावर ते म्हणायचे की, असं बिलकूल नाही. आम्ही इतरांप्रमाणे सामान्य अन्न खातो. या मुलाखतीत टेमजेन यांनी स्पष्टपणे सांगितले की, या सर्व गोष्टी निव्वळ अफवा आहेत, त्यात एक टक्काही तथ्य नाही. नागालँडचे लोक मानसं खात नाहीत. नागालँडच्या मंत्र्याने दिलेल्या या स्पष्टीकरणावरुन लोकांच्या मनातील शंका नक्कीच दूर होतील.