नागाव: चित्रपट निर्माती लीना माणिकेलईच्या 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरवरून झालेल्या वादात आता आसाममधील एका तरुण-तरुणीविरोधात भगवान शिव-पार्वतीचा अपमान करणे महागात पडले आहे. आसाममधील नागावमध्ये भगवान शंकराची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली, नंतर नोटीस देऊन सोडण्यात आले. अभिनेत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेला आरोपी अभिनेता काही सामाजिक मुद्द्यावर भगवान शिवाच्या वेषात रस्त्यावर पथनाट्य करत होता.
नेमकं काय झालं?भगवान शंकराची भूमिका करणाऱ्या तरुणाला पोलीस लवकरच न्यायालयात हजर करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅससह इतर खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींविरोधात शनिवारी नागाव शहरातील कॉलेज चौकाजवळ भगवान शिव आणि माता पार्वतीची वेशभूषा करून तरुण-तरुणी दुचाकीवरून आले. यावेळी त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल संपल्याने शिव आणि पार्वती यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
पथनाट्यातून सरकारवर निशाणाया वादाचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेली वाढ. याशिवाय शिव आणि पार्वती यांच्यात औषधांच्या किमतीत झालेली वाढ आणि बेरोजगारीच्या समस्येवरुनही वादावादी झाली. दोन्ही कलाकारांचे वादविवाद ऐकण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. भगवान शिवाची भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत भाजप सरकार केवळ भांडवलदारांच्या हितासाठी काम करत असून या सरकारला सर्वसामान्यांची अजिबात काळजी नाही, असे म्हटले आहे. दरवाढीविरोधात कलाकारांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. याठिकाणी पथनाट्य सादर केल्यानंतर दोन्ही कलावंत बडा बाजार येथे पोहोचले आणि तेथेही अशीच पथनाट्ये सादर केली.
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने गुन्हा दाखल केलाशंकराचा वेष धारण करणाऱ्या कलाकाराचे नाव विरिंची बोरा आणि पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या मुलीचे नाव करिश्मा असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांचा अभिनय काही काळ शहरात चर्चेचा विषय ठरला होता. पण, हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करत भगवान शिवाची भूमिका करणाऱ्या तरुणांविरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या नागाव जिल्हा समितीचा रोष उसळला. विरिंची बोरा यांनी हिंदु सनातन धर्माशी खेळ केला आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे, असा आरोप दोन्ही समित्यांनी केला आहे. तसेच, विरिंची बोरा याच्याविरुद्ध नागाव सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.