नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यानंतर आता काँग्रेसमधील काही इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री नगमा यांनीही ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. सोनिया गांधी यांनी राज्यसभेचं वचन दिलं. मात्र आता 18 वर्षांनंतरही या वचनाची पूर्तता झालेली नाही म्हणत नगमा यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं
नगमा यांनी दोन ट्वीट केले आहेत. यातील पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांचं ट्वीट रिट्विट करत आपली 18 वर्षांची तपस्या इमरान भाईंसमोर कमी पडल्याचं मत व्यक्त केलं. पवन खेरा यांनी काँग्रेसची यादी जाहीर झाल्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये कदाचित माझी तपस्या काहीशी कमी पडल्याचं म्हटलं आहे.
"काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून मी 2003-04 काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तेव्हा सोनिया गांधी यांनी स्वतः मला राज्यसभेचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेतही नव्हता. आता या गोष्टीला 18 वर्षे झालेत मात्र त्यांना अद्याप एकही संधी सापडलेली नाही. इमरान यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर घेण्यात आलं. मी पात्र नाही का? असा माझा प्रश्न आहे" असं नगमा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.