भावेश ब्राह्मणकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय महसूल सेवा अकादमीत ते दोघे भेटले. प्रशिक्षणाच्या काळात गाठी-भेटी सुरू होत्या. ही अकादमीच आयुष्यात मोलाची ठरली. दोघांनी एकमेकाला स्वीकारलं आणि त्यांच्या जीवनात गुलाबी पर्वाचा आरंभ झाला. ही काहीशी चित्रपट कथा आहे अरविंद आणि सुनीता केजरीवाल यांच्या लव्ह स्टोरीची.
प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी, मॅगसेसे पुरस्कार विजेते, आपचे संयोजक, दिल्लीचे मुख्यमंत्री, अशी अनेक यशोशिखरे चढणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा व्हॅलेंटाइन साकारला गेला आॅरेंज सिटी नागपूरमध्ये. खरगपूरच्या आयआयटीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांची निवड झाली, ती भारतीय महसूल सेवेत. प्रशिक्षणासाठी ते नागपूरच्या अकादमीत दाखल झाले. त्याच वेळी सुनिता आणि अरविंद यांची भेट झाली. पहिल्याच नजरेत जणू त्यांनी एकमेकाला ओळखले. प्रशिक्षण घेता-घेता दोघेही एकमेकांच्या जवळ येत गेले. एकमेकांचा स्वभाव, विचार आणि एखाद्या बाबीकडे पाहण्याची दृष्टी हे सारेच ते जोखत होते.
एकमेकांसोबत अनेक तास घालवू लागले. प्रपोज करण्यासाठी त्यांना अनेक महिने लागले. अखेर अरविंद यांनी हिंमत केली आणि गुलाबाचे फूल घेऊन ते सुनीतांकडे गेले. प्रामाणिकता, स्पष्टवक्ता आणि निष्पक्ष असे व्यक्तिमत्त्व असलेल्या अरविंद यांना सुनीता यांनी तत्काळ होकार दिला. अरविंद यांना हा सुखद धक्काच होता. दोघांच्या घरच्यांनी लगेच मंजुरी आली. आॅगस्ट, १९९४ मध्ये दोघांचा साखरपुडा आणि नोव्हेंबर, १९९४ मध्ये विवाह झाला. स्वप्नवत वाटाव्या, अशा गुलाबी आयुष्याला त्यांनी प्रारंभ केला.
प्रशिक्षण १९९५ मध्ये पूर्ण झाल्यानंतर दोघेही दिल्लीला परतले. पुढे अरविंद यांनी नोकरी सोडून समाजसेवा सुरू केली. लोकपालसाठीचे आंदोलन, उपोषण असो की, राजकारणात येण्याचा निर्णय, अशा सर्वच बाबींत सुनीता यांची साथ आहे. यंदाच्या व्हॅलेंटाइन आठवड्यात सत्तेचे गिफ्टही मिळाले.ते गिफ्ट पत्नीला : अरविंद केजरीवाल यांनी विजयाची तिसऱ्यांदा विजय मिळवून केवळ कार्यकर्त्यांनाच नाही, तर पत्नीलाही गिफ्ट दिले. तेही वाढदिवशीच. येत्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे आहे. त्या दिवशी केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.